Sushma Andhare Sarkarnama
पुणे

BJP Vs Shivsena: भाजपकडून ‘बुद्धीजीवी प्रकोष्ठ’ची नियुक्ती: बार्किंग ब्रिगेड, टॅटूधारी बायका, अडाणटप्पू...म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपला डिवचलं

Shivsena News: भाजपची बौद्धिक दिवाळखोरी समोर आल्यामुळेच पक्षाला बुद्धीजीवी प्रकोष्ठ स्थापन करण्याची गरज पडली, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. भाजपच्या प्रवक्त्यांवर टीका करताना त्यांनी फडणवीसांच्या ‘बार्किंग ब्रिगेड’चा उल्लेख करत थेट निशाणा साधला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार बुद्धीजीवी प्रकोष्ठाच्या प्रदेश कार्यकारिणीची २०२६ साठी घोषणा करण्यात आली आहे. 'बुद्धीजीवी प्रकोष्ठा'चे प्रभारी विश्वास पाठक यांनी नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, या नियुक्त्यां जाहीर होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपची बौद्धिक दिवाळखोरी समोर आल्यामुळेच पक्षाला बुद्धीजीवी प्रकोष्ठ स्थापन करण्याची गरज पडली, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. भाजपच्या प्रवक्त्यांवर टीका करताना त्यांनी फडणवीसांच्या ‘बार्किंग ब्रिगेड’चा उल्लेख करत थेट निशाणा साधला आहे.

अंधारे म्हणाल्या, “ज्या अर्थी भाजपाने बुद्धिजीवी प्रकोष्ठची निर्मिती केली आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, भाजपने मान्य केले आहे. की, ज्यांना नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा हिंदू मुस्लिम याच्यापलीकडे आपला मेंदू चालवताच येत नाही असे अडाणटप्पू प्रवक्ते, आक्रस्ताळेपणा करत चित्रविचित्र आवाजात किंचाळणाऱ्या टॅटूधारी बायका, ज्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी पायाला 56 बांधून फिरण्यात धन्यता मानतात यांच्यामुळे पक्षाची बेअब्रू होत आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे नाव न घेता सुषमा अंधारे यांनी भाजपा आमदार चित्रा वाघ यांच्यावर टीका केली तसंच इतर प्रवक्त्यांवर देखील निशाणा साधला.

भाजपच्या नव्या प्रकोष्ठावर उपरोधिक भाष्य करताना अंधारे यांनी पुढे म्हटले, “असो, बुद्धिजीवी प्रकोष्ठ पहिले बौद्धिक शिबिर हे फडणवीसांच्या बार्किंग ब्रिगेडसाठी घेईल अशी आपण अपेक्षा करूया...”

दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या बुद्धीजीवी प्रकोष्ठाच्या प्रदेश कार्यकारिणीत पुण्याचे भरत आमदापुरे यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहसंयोजक म्हणून नाशिकचे विनायक गोवीलकर, छत्रपती संभाजीनगरचे राम भोगले, मुंबईचे किरण शेलार, ठाण्याचे मकरंद मुळे, नागपूरचे अनिल पारख आणि अमरावतीचे अरविंद नळकांडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भाजपचे माध्यम प्रमुख गोविंद येतेयकर यांच्या स्वाक्षरीने या नियुक्त्यांचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नव्या प्रकोष्ठाच्या स्थापनेवरून ठाकरे गटाकडून झालेल्या या टीकेनंतर आता भाजपकडून त्याला काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT