Pune BJP Sarkarnama
पुणे

BJP Leaders : ऐकावं ते नवलंच! दिल्लीच्या मंत्र्यांना चक्क पुण्याची हवा सोसेना...

Pune BJP News : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध उपक्रमांना बड्या नेत्यांची हजेरी

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : महायुतीने कोणत्याही स्थितीत लोकसभेत 400 प्लस जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. परिणामी दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यातच थंडी वाढल्याने दिल्लीतील हवाही प्रदूषीत झालेली आहे. दिल्लीतील हवेच्या तुलनेत पुण्यातील वातावरण कितीतरी पटीने चांगले आहे. असे असतानाही, दिल्लीच्या मंत्र्यास चक्क पुण्याची हवा मानवली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) वतीने देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहे. यात भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमात अनेक बडे नेते सहभागी होताना दिसत आहे. पुण्यातील भारत संकल्प यात्रेस केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आले होते. त्यांनी बुधवारी धनकवडी येथील यात्रेअंतर्गत कार्यक्रमांत सहभाग घेतला होता.

वडगाव शेरी गुरुवारी भागातील उपक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. यानंतर शुक्रवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान येथे महापालिकेच्या खाद्यमहोत्सवाचे उदघाटनही त्यांच्या हस्ते झाले. सलग तीन दिवस त्यांनी पुण्यातील विविध उपक्रमांत सहभाग घेतला. या काळात त्यांना हवेतील धुलीकणाचा त्रास झाला. दरम्यान, प्रशासनानेही पुण्यात आल्यानेच मंत्री आजारी पडल्याचे सांगितले.

चौबे बुधवारपासून पुणे दौऱ्यावर असून त्यांनी विविध उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमांनंतर ते पत्रकार परिषद घेऊन उपक्रमाची आणि केंद्रीय योजनांची माहिती देणार होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांनी शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले. तसेच त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. यानंतर त्यांनी पुण्यात थांबण्याचा निर्णय रद्द करून थेट दिल्ली गाठल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्याच्या वातावरणात बदल

पुण्यात लोकसभेसाठी (Pune) भाजपमध्ये स्पर्धा वाढल्याने इच्छुकांकडून कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. काँग्रेसमध्ये म्हणाव्या तशा हलचाली अद्याप सुरू झालेल्या नाहीत. मात्र पुण्यातील थंडी अचानकच वाढली आहे. ही गुलाबी थंडी वाटत असली तरी धुलीकणांमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. याचाच फटका दिल्लीतील मंत्र्यांना बसला आहे. दरम्यान, दिल्लीपेक्षा पुण्याची हवेची गुणवत्ता कितीतरी पटीने चांगली असते. असे असतानाही दिल्लीकरांना पुण्याची हवा सोसली नाही, याचीच पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT