ajit pawar, chandrakant patil Sarkarnama
पुणे

Pune Politics : अजितदादा पालकमंत्री झाले, तरीही चंद्रकांतदादा म्हणतात, "कायद्यान्वये सहपालकमंत्री मीच..."

Mangesh Mahale

Pune : पुण्याचे पालकमंत्री होण्याची सुप्त इच्छा बाळगून असलेले अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांना खासगीत पुण्याचे 'सुपर पालकमंत्री' बोलण्याला सुरुवात झाली होती. अखेर ते पुण्याचे पालकमंत्री झाले, पण ‘आपण पुण्याचे पालकमंत्री नसलो, तरी कायद्यान्वये सहपालकमंत्री आहोत,’ असे चंद्रकांत पाटलांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले आहे. आता चंद्रकांतदादा आणि अजितदादा यांच्यात पुण्याचा 'दादा' कोण यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी नुकतीच भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत काढली आहे. भाजपच्या आमदारांशी चर्चा करताना पाटील यांनी आपली कार्यपद्धती ‘जैसे थे’च राहणार असल्याचे नमूद केले. पुण्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमोर नुकतीच बैठक झाली. पूर्वीप्रमाणे आपली कामे सुरूच असतील, असे चंद्रकांतदादांनी बैठकीत स्पष्ट केले.

शहरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेण्यासाठी दोन महिन्यांनी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजितदादांच्या विरोधात आयुष्यभर लढतो, त्यांच्याकडे पालकमंत्रिपद गेले, आता जिल्ह्यात भाजपचा विस्तार कसा होणार," असा प्रश्न गुरुवारी आयोजित आढावा बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांतदादांसमोर उपस्थित केला होता. त्यावर चंद्रकांतदादांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सहभागी झाल्यापासूनच त्यांनी पुणे जिल्ह्यात आपलं लक्ष अधिक केंद्रित केलं आहे. अजितदादांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांसोबतच्या अजितदादांच्या बैठका सुरूच आहेत. अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या एकाही बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहिलेले नाहीत. अजित पवार पालकमंत्री झाल्यामुळे चंद्रकांत पाटील गट कमालीचा नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. नाराज भाजप पदाधिकाऱ्यांसोबत अजितदादा कसे जुळवून घेतात, हे लवकरच कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT