लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामती तालुक्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते चंद्रराव तावरे हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक या निवडणुकीनिमित्त एकत्र येणार अशी चर्चा होती. पण अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. पाठोपाठ तावरे यांनी सडेतोड उत्तर देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पवार-तावरे यांच्यातील पारंपारिक संघर्ष या निवडणुकीनिमित्त पुन्हा उफाळून येणार आहे. अशात अजित पवार यांनी एक मोठी खेळी करत खळबळ उडवून दिली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरुवारी (22 मे) पदाधिकाऱ्यंच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात अजित पवार यांनी स्वतंत्र पॅनेलमधून लढण्याचा मनसुबा जाहीर केला. यावेळी त्यांनी प्रचाराचा प्रारंभ करतानाच कारखान्याचा अध्यक्ष कोण असणार हेच जाहीर करणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. ही अजितदादांची खेळी आता तावरे कशी परतवून लावतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवार यांच्या या घोषणेवर तावरे यांनीही पत्रकार परिषदेमध्ये लागलीच याचे उत्तर दिले. ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये असे चालते का? निवडणुकीच्या अगोदर अध्यक्षांचे नाव जाहीर करणे म्हणजे 20 हजार सभासदांना किती गृहित धरतात, तालुक्यात विकास केला म्हणता, रस्ते, दिवाबत्ती, पाण्याच्या सुविधा करणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे कामच आहे. पण साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. येथे राजकारण नको, असा सल्लाही दिला.
माळेगाव कारखान्याच्या एका निवडणुकीत अजित पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, ही सल त्यांच्या मनात कायमची राहून गेली आहे. चंद्रराव तावरे यांनी 1999 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात विधानसभेचीही निवडणूक लढविली होती. सुरुवातीपासूनच या दोघांमधील संघर्ष तालुक्याने पाहिला आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तावरे यांनी आपण अजित पवार यांना मदत केली असल्याचा दावा केला होता. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार व चंद्रराव तावरे यांच्यात दिलजमाई होणार का? या मुद्यावर गेले अनेक दिवस चर्चा रंगत होत्या.
प्रत्यक्षात अजित पवार यांनी तडाखेबंद भाषण करत आपण पूर्ण ताकद लावून ही निवडणूक लढविणार असल्याचे व संपूर्ण यंत्रणा वापरून अनेकांवर जबाबदारी सोपवून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर करून या चर्चांवर पडदा पाडला. मलाही एकदा बघायचेच आहे काय होते ते, या शब्दात त्यांनी आपली तयारी बोलून दाखविली. एकीकडे अजित पवार यांच्याकडे सत्ता असली तरीही चंद्रराव तावरे यांना मानणारा सभासदवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता माळेगावचा सभासद नेमकी काय भूमिका घेणार, या कडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.