Uma Khapre, Prasad Lad  sarkarnama
पुणे

फडणवीसांनी शेवटच्या क्षणी स्ट्रॅटेजी बदलली; लाडांना केले सेफ, खापरे "डेंजर' झोनमध्ये?

विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने पाच उमेदवार दिले आहेत.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : विधानपरिषदेच्या (Legislative Council Election) दहा जागांसाठी आज मतदान झाले. त्यात राज्यसभेप्रमाणे चमत्कार होण्याची शक्यता न दिसताच भाजपने (BJP) म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अगोदर ठरलेल्या स्ट्रॅटेजीत मतदानाच्या शेवटच्या क्षणी बदल केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यानुसार उमेदवारीची लॉटरी लागलेल्या पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) उमा खापरे (Uma Khapre) यांच्याऐवजी प्रसाद लाड (Prasad Lad) यांना सेफ करण्यात आल्याने अगोदर सेफ असलेल्या खापरे या नंतर डेंजर झोनमध्ये गेल्याचे कळते. दरम्यान, ही व्यूहरचना ऐनवेळी भाजपने बदलली हे काही तासांतच या निवडणुकीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदार आहेत. भाजपच्या संख्याबळानुसार त्यांचे चार उमेदवार निवडून येणार आहेत. तरीही त्यांनी पाचवा उमेदवार उभा करून ही निवडणूक बिनविरोध न होण्यास हातभार लावला. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेलाही अपक्ष आमदारांच्या मदतीने चमत्कार घडवू, असा दावा भाजप व त्यांच्या सर्वच नेत्यांनी केला होता. मात्र, तब्बल २२ मतांची बेगमी करणे त्यांना अवघड झाले. राज्यसभेला त्यांनी नऊ अपक्षांची मते घेण्याचा चमत्कार केला होता. तो विधानपरिषदेला सफल होत नाही, असे लक्षात येताच भाजपने आपल्या उमेदवारांचा पसंतीक्रम बदलला, असल्याचे सांगण्यात येत आहे.

चार नंबरबर सेफ केलेल्या खापरे यांच्याऐवजी ही जागा डेंजर झोनमधील लाड यांना देण्यात आली. अगोदर घोडेबाजार करू न शकणाऱ्या खापरेंना चौथा नंबर देऊन तो करू शकणारे या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार लाड यांना पाचवे स्थान भाजपने दिले होते. मात्र, त्यांचे संघटनेतील पद (प्रदेश उपाध्यक्ष) आणि महत्व तसेच फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक ध्यानात घेऊन त्यांना सेफ करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांचा विधानपरिषदेतील अनुभवही जमेस धरला गेला असे समजले. नवख्या खापरेंच्या तुलनेत त्यांची उपयुक्तता पक्षाला अधिक आहे व भविष्यातही ती राहणार आहे. याचा सुद्धा पक्षाने विचार केल्याचे कळते.

भाजपने बदललेल्या या गेमप्लॅनचा फटका खापरेंना बसणार आहे. त्यामुळे भाजपचा पिंपरी-चिंचवडमध्ये तिसरा आमदार होणार नाही. सध्या विधानसभेत त्यांचे महेश लांडगे (भोसरी) व लक्ष्मण जगताप (चिंचवड) हे दोन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अण्णा बनसोडे (पिंपरी) असे तीन आमदार शहरात आहेत. जगताप हे पूर्वी विधानपरिषदेत होते. ते आता दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. तरीही त्यांनी राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीलाही रुग्णवाहिकेतून पिंपरी-चिंचवड ते मुंबई प्रवास करीत आज मतदान केले. त्यांच्याप्रमाणे भाजपच्याच पुण्यातील (कसबा पेठ) आमदार मुक्ता टिळक यांनी सुद्धा या निवडणुकीत रुग्णवाहिकेतून पुणे-मुंबई प्रवास करीत मतदान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT