Ajit pawar_Dattatray bharane_Harshvardhan patil Sarkarnama
पुणे

बारामतीत भाजपला जे जमलं; ते इंदापुरात राष्ट्रवादीला का जमू नये!

इंदापूरमध्ये २०१४ पासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे.

राजकुमार थोरात - Sarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : बारामती तालुक्यातील भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात सोमेश्‍वर सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लढवून दाखवली. दुसरीकडे, इंदापूर तालुक्यात मात्र राष्ट्रवादीने कर्मयोगी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेत कारखाना बिनविरोध करण्यास मदत केली. बारामतीत भाजपला जे जमले, ते इंदापुरात राष्ट्रवादीला जमले नाही, असे चित्र पहायला मिळाले. आगामी काळात जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व भाजपची काय भूमिका राहणार, याकडेही इंदापूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (BJP contested Someshwar factory election, then why NCP did not contest Karmayogi's election)

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, तर इंदापूरमध्ये २०१४ पासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले दत्तात्रेय भरणे हे सध्या सहा खात्याचे राज्यमंत्री आहेत. प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर नेतेमंडळी आहेत.

इंदापूर तालुक्यातील कर्मयाेगी सहकारी साखर कारखान्याची व बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने एकहाती सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या विरोधात पहिल्यांदा भाजपपुरस्कृत पॅनेल उभा केला होता. पण, भाजपच्या ११ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, तर १६ हजारांच्या मताधिक्याने भाजपच्या पॅनेलचा पराभव झाला. असे असले तरी भाजप पुरस्कृत उमेदवारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याची दाखवलेली जिद्द चर्चेचा विषय झाला होता. भाजपच्या नेत्यांचे सोमेश्‍वर कारखान्याच्या कामकाजावर लक्ष राहणार असून विरोध गट असल्यामुळे सत्ताधाऱ्यावर वचक राहिल.

याउलट इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घडले. तालुक्यात राष्ट्रवादीचे राज्यमंत्री भरणे व जिल्हाध्यक्ष गारटकर असतानाही पक्षाने भाजप नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करून ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. राष्ट्रवादीने गेल्या वर्षभरात कर्मयोगी कारखान्याची निवडणूक लढविण्याची कुठल्याही प्रकारची तयारी केली नसल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे कर्मयाेगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रत्येक निवडणुकीत कर्मयोगी कारखान्याच्या प्रशासनावर व संचालक मंडळावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीले निवडणूकीतून घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरत आहे.

कर्मयोगी कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादीने निवडणूक लढवली नसल्याचा खुलासा केला होता. इंदापूर तालुक्यात अडचणीमध्ये असणाऱ्या संस्थेच्या निवडणूक राष्ट्रवादी लढवणार नसेल तर फायद्यात असणाऱ्या संस्थाच्या निवडणूक लढवून काय साध्य करायचे आहे, असा सवाल जनता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच विचारेल. तसेच, कर्मयाेगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे संचालक मंडळ व प्रशासनावर विरोधक म्हणून कोणाचा वचक राहणार आहे, हेही महत्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT