Devendra Fadnavis, Sanjay Raut,
Devendra Fadnavis, Sanjay Raut, sarkarnama
पुणे

आमदारांना घोडा म्हटलेलं आवडलं नाही ; फडणवीसांचा राऊतांना टोमणा

सरकारनामा ब्युरो

पुणे : 'राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होईल,' असा आरोप महाविकास आघाडी सरकारनं भाजपवर केला होता. या आरोपावर निवडणूक निकालानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडकून टीका केली आहे. (Rajya Sabha Election latest news)

राज्यसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यावर विजयाचं गणित अवलंबून होतं. त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी बाजूनं जोरदार घोडेबाजार रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

निवडणुकीनंतर 'घोडेबाजार'वरुन फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला टोमणा लगावला आहे. फडणवीस माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "आमदारांना घोडा म्हटलेलं आवडलं नाही,"

"घोडेबाजार" या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार(Kishor Jorgevar) यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. हा शब्द नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना "वेगळा विचार करावा लागेल", असा इशाराही त्यांनी दिला होता. "अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणे महापाप आहे. 'घोडेबाजार' हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब होते," असे ते म्हणाले होते. याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जोरगेवार यांनी सांगितले आहे.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते आहेत. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण प्रदूषित, गढूळ झालं असताना राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अजून बिघडण्याची शक्यता वाटत आहे. घोडेबाजार महाराष्ट्रात अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे”.

फडणवीस यांनी राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार केला होता. "आम्ही घोडेबाजार करणार नाही. कारण आमचे तीन उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटातील महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा म्हणजे घोडेबाजारचा प्रश्न येणार नाही," असे फडणवीस म्हणाले होते.

भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होईल या महाविकासआघाडी सरकारच्या आरोपवर टीका केली होती. “घोडेबाजार होईल असं म्हणणं म्हणजे राज्यातील १२ कोटी लोकांचा अपमान आहे,” असा आरोप खोत यांनी केला होता. "ज्यांना घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे फुटाणे असतीलच, कारण घोड्याला खायला लागतं,” असं म्हणत त्यांनी मविआ नेत्यांना टोला लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT