Pune News : महापालिकेत ५० टक्के महिला आरक्षणामुळे सभागृहात महिलांचे संख्याबळ वाढले. निवडणुकीच्या धामधुमीत ९१ महिला नगरसेविका सभागृहात दाखल झाल्या, महिलांचे नेतृत्व शहराच्या कारभारात ठळकपणे दिसेल अशी अपेक्षा होती. पण अवघ्या काही दिवसांतच ‘नामधारी’ आणि ‘कारभारी’ यांचे वेगळेच चित्र समोर आले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून निवडणूक तब्बल दोन हजार जण इच्छुक होते. संधी न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. काहींना ‘अॅडजस्टमेंट’ करावे लागले, स्वतःसाठी नाही, तर मुली, बहिणी, सुनेसाठी किंवा बायकोसाठी तिकीट घ्यावे लागले. घरात तिकीट मिळाले यावर समाधान मानून काहींनी निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील. पण विजयानंतर ‘आम्हीच नगरसेवक झालो’ अशा अविर्भावात काही नेते फिरताना दिसतात.
महिला नगरसेवकांच्या ऐवजी त्याचे नातेवाईक पती, भाऊ,वडील, चुलते, काका हे आपणच नगरसेवक असल्याच्या अविर्भावात असल्याचे फिरतात तेव्हा त्यांना 'झेराॅक्स' नगरसेवक म्हटले जाते. भाजपच्या या झेराॅक्स नगरसेवकांची सध्या पुण्याचा राजकारणात चलती आहे.
निवडून आलेल्या महिला नगरसेविकांचा भाऊ,वडील, चुलते, मुलगे, पती किंवा पुतणे यांचा प्रशासकीय कामात वाढता हस्तक्षेप होत असल्याचे चित्र आहे. प्रभाग समितीच्या बैठका, क्षेत्रीय कार्यालये, ठेकेदारांशी संबंध सर्वत्र नातेवाईकांचे ‘कारभारीपण’ दिसते. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना दमदाटी, दबाव सहन करावा लागतो. गोखलेनगर-वाकडेवाडी सारख्या प्रभागात पाणी गढूळ, कचरा न उचलणे, स्वच्छतागृहे दुरवस्थेत असताना लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप आहेत. उलट ठेकेदारांशी संगनमत, बिर्याणी पार्टी, निविदा रिंग अशा चर्चा रंगतात.
महापालिका प्रशासनाने या ‘पती कारभारी’ आणि नातेवाईक हस्तक्षेपाच्या प्रवृत्तीवर लगाम घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा ५० टक्के महिला आरक्षणाचे खरे उद्दिष्टच धुळीला मिळेल आणि सभागृहात ‘नामधारी’ चे स्वरूप अधिक ठळक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शिवाजीनगर परिसरात देखील नगरसेविकेच्या घरातील व्यक्ती वॉर्ड ऑफिस मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना आदेश देत असल्याचं देखील प्रकरण समोर आला आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल लागून अवघे काही दिवस उलटले नव्हते, तोच वाघोली परिसरातील एका महिला नगरसेविकेच्या पतीने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. नगरसेविका उपस्थित होत्या, पण सूचना देण्याची, प्रश्न विचारण्याची आणि तात्काळ माहिती मागण्याची भूमिका पूर्णपणे पतीने सांभाळली. प्रभागातील स्वच्छतेचे काम कोणत्या संस्थांकडे आहे, कोणत्या सोसायट्यांमधून कचरा उचलला जातो, जबाबदारी कोणाकडे आहे — याची सविस्तर माहिती ताबडतोब सादर करा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला.
तिसरा धक्कादायक प्रकार लोहगावात घडला. बेकायदेशीर रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट्समुळे नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे महापालिकेने कारवाईला वेग दिला. मात्र कारवाईसाठी लोहगाव मधील प्लांटवर पथक दाखल झाले. ही माहिती मिळताच भाजप नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती खांदवे घटनास्थळी धावले. कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला, अधिकारी-कर्मचाऱ्यांशी बाचाबाची केली आणि अंगावर धावून गेल्याचे प्रकार घडले. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेत पिंजऱ्यात बसवले आणि पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर प्लांट पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या समित्यांच्या बैठकांमध्ये देखील हे कुटुंबातील व्यक्ती उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सोबतच अशा प्रकारची झाल्याने पुढील पाच वर्षात आणखी कोणत्या कोणत्या घटना पाहायला मिळणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.