Rahul Kul, Ramesh Thorat Sarkarnama
पुणे

Daund APMC News : ...म्हणून दौंड बाजार समितीमध्ये आमदार राहुल कुलांना मिळाली सत्ता; राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदाच धक्का

Bjp News : दौंड बाजार समितीवर स्थापनेपासून म्हणजे १९५९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात गटाची सत्ता होती.

सरकारनामा ब्यूरो

Daund Bazar Samiti News : दौंड बाजार समितीवर स्थापनेपासून म्हणजे १९५९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात गटाची सत्ता होती. ती उलथवून टाकण्यात भाजपचे आमदार राहुल कुल यांना प्रथमच यश आले आहे. कुल यांच्या माध्यमातून दौंड बाजार समितीवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला.

भाजप समर्थक गणेश जगदाळे (लिंगाळी) यांची दौंड (Daund) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) सभापतिपदी, तर उपसभापतिपदी शरद कोळपे (दहिटणे) यांची निवड झाली. मागील पंचवार्षिकमध्ये थोरात गटाची एकहाती सत्ता होती. या निवडणुकीत राहुल कुल यांनी नऊ जागा जिंकत राष्ट्रवादीचे थोरात यांच्याशी बरोबर केली होती. त्यावरुन सभापती पद कुणाला मिळणार याची चर्चा होती.

बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेलने ९, तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलाही ९ जागा मिळाल्या होत्या. मात्र, व्यापारी मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनेलमधून निवडून आलेले संचालक संपतराव निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर भाजप (BJP) पुरस्कृत पॅनेलचे ०९, तर राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचे ८, असे संख्याबळ झाले.

दौंड बाजार समितीच्या अध्यासी अधिकारी, सहायक निबंधक (सहकार) हर्षित तावरे यांच्या देखरेखीत सभापती आणि उपसभापती निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. सभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे गणेश जगदाळे व शेतकरी विकास पॅनेलचे बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दाखल केले. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात गणेश जगदाळे यांना ९ तर बाळासाहेब शिंदे यांना ८ मते पडली.

उपसभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे शरद कोळपे व शेतकरी विकास पॅनेलच्या वर्षा मोरे यांच्यात लढत झाली. शरद कोळपे यांना ९ तर वर्षा मोरे यांना ८ मते पडली. मतमोजणीनंतर हर्षित तावरे यांनी सभापतिपदावर गणेश जगदाळे व उपसभापतिपदी शरद कोळपे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT