Pune News : शिस्त आणि पक्षनिष्ठा यांच्या गोष्टी करणाऱ्या भाजप पक्षातील अंतर्गत संघर्षाने सध्या सगळ्यांचेच लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वी टक्केवारीच्या वादावरून भाजपच्या दोन महिला नगरसेविका पुणे महानगरपालिकेतच भिडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर वरिष्ठांनी यामध्ये दखल घेत दोन्हीही महिला नेत्यांची समेट घडून आली होती. मात्र त्यानंतर भाजपमधील दोन महिला नगरसेविका आमने-सामने आले असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक 22 च्या दोन महिला नगरसेविकां मध्ये वाद पेटला असून, हा वाद थेट पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. नगरसेविका अर्चना पाटील यांनी आपलीच सहकारी मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील प्रभाग 22 मध्ये भाजपच्या अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे या दोन नगरसेविका कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील शीतयुद्ध आता उघड संघर्षात रूपांतरित झाले आहे. अर्चना पाटील यांचा आरोप आहे की, मृणाल कांबळे यांनी त्यांचे 'मॉर्फ केलेले' व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवून त्यांची बदनामी केली आहे.
विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीतील विधाने फिरवून, जे पाटील बोलल्याच नाहीत, ते त्यांच्या तोंडी घातल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
हा वाद केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता अर्चना पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र धाडले आहे. पोलिसांत तक्रार करण्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
दुसरीकडे, मृणाल कांबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अर्चना पाटील या केवळ प्रसिद्धीसाठी आणि विकासकामांत अडथळा आणण्यासाठी असे स्टंट करत असल्याचा पलटवार कांबळे यांनी केला आहे. दरम्यान पक्षाच्या वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करूनही तोडगा न निघाल्याने आता हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.