BJP Vs NCP Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

BJP Vs NCP (SP) : भाजपला धक्का! मोठा नेता हाती घेणार तुतारी, विधानसभेसाठी ठोकला शड्डू

सरकारनामा ब्यूरो

सागर आव्हाड

Bapusaheb Pathare News : शरद पवार गटाकडून भाजपला मोठा धक्का देण्यात आला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप नेते, माजी आमदार बापूसाहेब पठारे हाती तुतारी घेत विधानसभा निवडणूक लढणार आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी (शनिवारी) गणेश मंडळांना भेट देत असताना बापू पठारे यांनी थेट आगामी विधानसभेसाठी आपण तुतारी हाती घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच मंडळांना तुतारीला मतदान करण्याचे आवाहनही केले.

बापू पठारे यांनी तुतारीचा प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार गटाकडून तेच पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीमधील मित्र पक्ष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील टिंगरे यांना विरोध करत हा मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी केली आहे.

बापू पठारे यांनी थेट तुतारी हाती घेणार असल्याचे जाहीर केल्याने टिंगरे विरुद्ध पठारे अशी लढत वडगाव शेरी मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले असले तरी वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी अपेक्षित लीड मिळाले नसल्याचे भाजप पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होतो आहे.

बापू पठारेंचा राजकीय प्रवास

बापू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. 2007 मध्ये त्यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. 2009 मध्ये त्यांना वडगाव शेरी मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. त्यावेळी ते आमदार म्हणून विजयी झाले होते. 2014 मध्ये भाजपचे उमेदवार जगदिश मुळीक यांनी पठारे यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये बापू पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते आत्ता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परत आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT