Mumbai News, 08 Sep : "देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन काय आहे? हे तुमच्यापेक्षा तुमच्या मालकाला चांगलं कळलं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो ते तुमच्या मालकाला विचारा," असं म्हणत भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत बोलताना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं होतं. "शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे शिजतंय, त्यांच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदासाठी तीन-चार चेहरे आहेत. मात्र, यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. मी पवारांच्या डोक्यात कोण आहे हे सांगू शकत नाही, पण कोण नाही हे सांगू शकतो," असं म्हटलं होतं.
फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही."
तर राऊतांची ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राणे म्हणाले, "शरद पवारांच्या डोक्यात काय सुरु आहे हे समजून घेण्यासाठी म्हणे फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतील. फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला चांगलं कळलं असेल. त्यांचा मेंदू कसा चालतो तुझा मालकाला विचार. फडणवीस हे सर्वांचे बाप आहेत," असा एकेरी भाषेत राणेंनी राऊतांवर पलटवार केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.