Crime News Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad News : पिंपरी पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरेंवर विनयभंग, अतिप्रसंगाचा गुन्हा

Pune Police : गुन्हा दाखल होऊन चार दिवसानंतरही कारवाई नाही; ठाकरेंनी आरोप फेटाळले

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Pune Crime News : गेल्या महिन्यात नोकरीसाठी पश्चिम बंगालहून पुण्यात आलेल्या २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे यांच्यासह चौघांवर दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील सत्ताकाळात शिक्षण मंडळाचे सभापतीपद भुषविलेले ठाकरे हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांची पत्नी मंदाकिनी या माजी नगरसेविका आहेत.

पिंपरी आणि पुण्यातील दोन इमारतीतील एका शेअर ट्रेड्रिंग कंपनीत १५ मे ते ४ जून दरम्यान ही घटना घडली. त्याबाबत पिंपरी पोलिसांनी ११ जूनला गुन्हा नोंदवून तो पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी पाठवून दिला. या चार आरोपीत एक महिलेचाही समावेश आहे. हा गंभीर गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. त्यामुळे या तरुणीने प्रसारमाध्यमांपुढे गुरुवारी (ता. १५) आपल्यावर झालेल्या अन्यायायाचा पाढा वाचला.

पोलिसांनी आरोपींना लवकर पकडून आपल्याला न्याय देण्याची विनंती केली. तिने दिलेल्या विनंतीपत्रात आपल्याला ठाकरे यांनी १५ हजारात विकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर माध्यमांशी संपर्क करू नये असे पोलिसांनी तिला बजावले. तिच्यावर दबाव आणल्याचे तिने 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. (Latest Marathi News)

महेश्‍वरी रेड्डी, चिरागउद्दीन शेख त्याची बायको असे इतर आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या पीडीत तरुणीने म्हटले की, तिने नोकरीसाठी एका वेबसाइटवर अर्ज केला होता. तेथून तिला एका खासगी बँकेतील नोकरीच्या मुलाखतीसाठी पुण्याला बोलावण्यात आले. पुण्यात आल्यावर तिला या नोकरीला वेळ असल्याचे सांगत एका तरुणीने ठाकरेंचा नंबर दिला.

ठाकरेंनी पुणे कॅम्पातील सदर ट्रेडिंग कंपनीत 15 मे रोजी तिला बोलावले. तेथे त्यांनी शेख, त्याची पत्नी आणि रेड्डीशी तिची ओळख करून दिली. त्यानंतर रेड्डीने ठाकरेंना 15 हजार रुपये दिले. तिथेच ठाकरे यांनी विनयभंग केला.

त्यानंतर मुख्य आरोपी रेड्डी याने वारंवार पुणे आणि पिंपरीतील कार्यालयात विनयभंग केला. तर, 3 जून रोजी पुण्यातील कार्यालयात बाथरूममध्ये जाऊन रेड्डीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. चिरागउद्दीनने पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, मी हे गैरकृत्य केलेले नाही. केवळ पैसे उकळण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोपावर दिले. फिर्यादी तरुणी आणि तिचा साथीदार हे ब्लॅकमेल करीत आहेत. पैसे उकळण्याची त्यांची ही खेळी आहे, असे ठाकरे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. मी स्वत: या शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केली आहे. या कंपनीतील दुसऱ्या एका गुंतवणुकदाराच्या शिफारसीवरून तेथे या तरुणीला नोकरी दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT