Pune News : पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक लवकरच होत आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील भाजपचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीतील सदस्य व भाजपचे प्रमुख नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाजपची राज्य कार्यकारणीची बैठक सोमवारी, 31 ऑगस्टला गणेश कला क्रीडा रंग मंदिरात होणार आहे.
आगामी काळात होत असलेल्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या बूथ कमिट्या आणि संघटनात्मक कामाचा सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यासोबतच या कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा करून काही महत्त्वाचे राजकीय व सामाजिक ठराव संमत केले जाणार आहेत.
त्यासोबतच महायुतीमधील मित्रपक्षांसोबत जागावाटप आणि समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्वागत आणि बैठक व्यवस्थेसाठी पुणे शहर भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
दरम्यान, भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या अनुषंगाने गुरुवारी शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्रदेश कार्यसमितीची बैठक यशस्वी आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे, तसेच बैठकीच्या नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.