

Nagpur News : राज्यातील तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघासाठी डिसेंबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु करण्यात आली आहे. या विधान परिषदेच्या आमदारांची निवड लवकरच होणार असल्याने आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप आतापसूनच ॲक्शन मोडमध्ये आला आहे. त्या दृष्टीने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दोन दिवसापासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी या मतदारसंघात झालेल्या पदवीधर नोंदणीवरून भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.
आगामी नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपची (BJP) टीम आतापासूनच कामाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्व विदर्भात दोन दिवसांत 6 संघटनात्मक बैठका घेतल्या आहेत. नागपूरमधील अंतिम बैठकीप्रसंगी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, परिणय फुके आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी उपस्थित असताना रवींद्र चव्हाण यांनी भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी "आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे का? आपली तशी इच्छा आहे का?" असा थेट सवाल विचारत उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सक्रियतेवर बोट ठेवत त्यांनी 80 टक्के कार्यकर्ते डिजिटलवर सक्रिय असल्याचे स्पष्ट करीत सोशल मीडिया प्रचारात भाजपची कामगिरी कमी पडत असल्याचे सांगत भर बैठकीतच नेतेमंडळींची कानउघाडणी केली आहे.
सोशल मीडिया पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि केंद्रीय-राज्य मंत्र्यांनी घेतलेले मोठे निर्णय आकर्षक डिझाईन्स व पोस्टर्सद्वारे स्वतःचे नाव व पदासह नियमितपणे शेअर करून महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण तयार केले पाहिजे. नागरिक समस्या सांगतात तेव्हा त्या ऐकून घ्या, पण भाजप कार्यकर्ता म्हणून आपण सरकारच्या कामांबाबत आक्रमकपणे बोलले पाहिजे, असे देखील रवींद्र चव्हाण म्हणाले.
पदवीधर मतदार नोंदणीचे दिले नवे टार्गेट
नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यातील अंदाजे 12 लाख सुशिक्षित पदवीधर आहेत. आगामी निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी किमान 50 हजार नवीन पदवीधर मतदारांची नोंदणी करून घ्यावी. केवळ डिजिटलवर न थांबता कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी, बूथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांनी प्रत्यक्ष गाठीभेटी वाढवाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.