MLA Mahesh Landge and Ajit Gavhane Sarkarnama
पुणे

'म्हैस अजून पाण्यातच अ्न निघाले तिचा सौदा करायला'; आमदार लांडगेंची मार्मिक टोलेबाजी

उत्तम कुटे

पिंपरी: आठ दिवसांपूर्वी (ता.२) अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते समर्थकांसह सामील झाले. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांत एकदम उलटफेर झाला. कालपर्यंतचे जानी दुश्मन दोस्त झाले. नव्या राजकीय समीकरणाचे परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार आहेत.

मात्र, त्या न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने गेले सव्वा वर्षे रखडल्या आहेत. कधी होतील, याविषयी खात्रीही नाही. बदललेल्या राजकीय स्थितीत राष्ट्रवादीसह त्या कशा लढणार असे विचारले "म्हैस अजून पाण्य़ातच तिचा सौदा कसा करणार?", अशी मार्मिक टोलेबाजी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि भसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली.

दुसरीकडे आपले नेते पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याने उद्योगनगरीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह भलताच दुणावला असल्याचे राज्यातील राजकीय स्थित्यत्यरानंतर दिसून आले आहे. त्यातूनच महापालिकेत पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.

महापालिकेतील आमच्या १५ वर्षाच्या सत्ताकाळात शहराचा विकास झालेला असल्याचे सांगत शहरवासियांचा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने महापालिकेत आमचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी त्यांनी सव्वावर्ष रखडलेली महापालिका निवडणूक वेळेत होईल की नाही, याविषयी मात्र, शंका व्यक्त केली. त्यापूर्वी लोकसभा निवडणूक अगोदर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. तर, यावर्षी २६ फेब्रुवारीला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लाखभर मते घेतलेले याच पक्षाचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आता २०२४ ची चिंचवडची निवडणुकही लढणार असल्याचा शड्डू ठोकला.

त्याचवेळी महापालिका निवडणूक कशी लढवायची याबाबतीत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे गव्हाणे आणि काटे या दोघांनीही स्पष्ट केले.तर, नव्या राजकीय भुंकमामुळे बदललेली राजकीय परिस्थिती आणि महापालिका निवडणुकीची अनिश्चितता यावर आमदार लांडगे यांनी नेमकी व मार्मिक टिपण्णी केली.

या निवडणुकीचे अजून कशातच काही नसून म्हैस ही सध्या पाण्यात (महापालिका निवडणूक ही न्यायालयाच्या फेऱ्यात असून ती होईल की नाही म्हणजे ही म्हैस पाण्याबाहेर येईल की नाही हे नक्की नसताना) असताना तिचा सौदा कसा करणार (म्हणजे महापालिका निवडणूक कशी लढणार, म्हणजे राष्ट्रवादीला घेऊन लढणार की कसे) अशी उलट विचारणा त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या सव्वा वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. गतवेळी २०१७ ला सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पराभव करून भाजप प्रथमच महापालिकेत सत्तेत आली. २०२२ च्या निवडणुकीसाठी त्यांनी `अब की बार सौ पार` ची घोषणा करीत पुन्हा सत्तेत येऊ, असा निर्धार केला होता.

मात्र, त्याला या नव्या समीकरणामुळे छेद बसला आहे. नवा भिडू मिळाल्याने भाजपला आता महापालिका निवडणूक ही शिवसेनाच (शिंदे) नाही, तर राष्ट्रवादीलाही बरोबर घेत लढावी लागणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT