Rath Yatra Sarakrnama
पुणे

Ayodhya Ceremony : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित रथयात्रेत भाजपचे 'हे' आमदार १३ किलोमीटर चालले!

Rath Yatra : देशभरात सर्वच ठिकाणी विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : अयोध्येतील आजच्या (ता. 22) श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भोसरीचे प्रखर हिंदूत्ववादी भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात रेकॉर्डब्रेक रथयात्रा काढली. त्यात ते 13 किलोमीटर पायी चालले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार)नेते नाना काटे यांनी चिंचवडला हा सोहळा साजरी करीत रामभक्तांना महाप्रसाद दिला, तर शरद पवार राष्ट्रवादीने शहर भिकारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला.

अयोध्येतील सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नाना काटे यांनी शहरातील पिंपळे सौदागरच्या राम मंदिरात आज साजरा केला. त्यानमित्त महाप्रसादाचे वाटप केले, तर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीने यानिमित्त उद्योगनगरी भिकारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला. शहरातील संभाजीनगर, शाहूनगर परिसरात मुस्लिमबांधवांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. एकूणच पिंपरी-चिंचवड राममय झाल्याचे आज दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार लांडगेंनी आपल्या मतदारसंघात भव्य रथयात्रा काढली. ती राज्यातील सर्वात मोठी असल्याचा आणि त्यात पाच लाख रामभक्त सामील झाल्याचा दावा त्यांनी केला. हजारो दुचाकी व चारचाकी, चार विजयरथ, राम मंदिर प्रतिकृती, मर्दानी खेळ, डी. जे. ढोल पथक, झांजपथक, श्रीराम जिवंत देखावा, गंगाआरती, सनई चौघडे, महाबली हनुमान, कलशयात्रा, आतषबाजीसह हिंदू धर्माबाबत जागृती करण्यासाठी विविध देखावे त्यात होते.

आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) हे त्यात तबब्ल 13 किलोमीटर पायी चालले. आजचा श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा हिंदू बांधवांच्या आणि भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, तसेच हिंदूत्व आणि अखंड भारताचा दुवा असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे ते म्हणाले.

नानांचा चिंचवडला महाप्रसाद -

नाना काटेंनी आज पिंपळे सौदागर येथील राममंदिरात अयोध्येतील श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा केला. महाप्रसादाचे वाटप केले. रहाटणी व पिंपळे सौदागरमधील राम मंदिरात आरती, रामरक्षा पठण, भजन, कीर्तन, महाप्रसाद करण्यात आले. तेथे अयोध्येतील सोहळा मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात आला.

राष्ट्रवादीचा भिकारीमुक्त पिंपरी-चिंचवडचा संकल्प

शरद पवारांच्या राष्ट़्रवादीचे शहर मुख्य प्रवक्ते, पर्यावरणप्रेमी माधव पाटील यांनी पिंपरी-चिंचवड भिकारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला. आपल्या समृद्ध शहरात शेकडो भीक मागतात, हे आपल्याला न शोभणारे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. म्हणून त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे शहर भिकारीमुक्त करण्याची लेखी मागणी आज केली. भीक मागणाऱ्या पिंकीला शाळेत जाताना पाहूया. रामनाम घेत देशातले पहिले भिकारीमुक्त शहर करण्यासाठी सर्वांनी लढूया, अशी साद त्यांनी घातली.

(Edited by Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT