Pune News : गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डीजेच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तीव्र आवाजाच्या डीजेला परवानगी दिली जाणार नाही, तसेच मीड प्रेशर आणि प्लाझ्मासारख्या कर्णकर्कश ध्वनियंत्रणांवर नियमभंग झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे.
दुसरीकडे, गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पुण्यात डीजेच्या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनीही या वादावर भूमिका मांडली आहे.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुणे शहराचा आदर्श महाराष्ट्रात निर्माण व्हावा, असा 'पुणे पॅटर्न' गणेशोत्सवाच्या दरम्यान तयार व्हावा, अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी गणेशोत्सव असो, दहीहंडी असो किंवा अन्य कुठलाही सण, समारंभ, जयंत्या-पुण्यतिथी असोत... पुणे शहरामध्ये डीजे, प्लाझ्मा, लेझर या सगळ्यांची दाणादाण उडालेली असते. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याचा त्रास होतो.
मी अनेकवेळेला याच्याविषयी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मी स्वतः देव आणि धर्म मानणारी आणि धर्मासाठी ॲक्टिव्हली काम करणारी कार्यकर्ती आहे. परंतु, मला असं वाटतं की, ज्या समाजप्रबोधनाच्या कारणासाठी गणेशोत्सव सार्वजनिक करण्याचं धोरण हे माननीय लोकमान्य टिळक यांनी घेतलं त्याच पद्धतीने तो झाला पाहिजे.
वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यानमाला असतील, उत्कृष्ट असे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, विविध प्रकारच्या स्पर्धा असतील; ज्याच्यामध्ये समाज एकत्र येईल, काही विचारमंथन होईल, विचारांची देवाणघेवाण होईल अशा प्रकारचे सकस कार्यक्रम अनेक सार्वजनिक गणेशोत्सव आता सध्यासुद्धा या पद्धतीने साजरे करतात, त्यांचं मी अभिनंदन करते.
पण काही गणेशोत्सव मंडळ जी आहेत, ती मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा, साऊंड असेल किंवा लेझरचा उपयोग करून गणेशोत्सव साजरा करत असताना आजूबाजूच्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो. ध्वनीची पातळी एवढी वाढलेली असते की ब्लड प्रेशर असलेले लोक, इतर पेशंट, लहान मुलं ही इतकी अस्वस्थ झालेली असतात! परीक्षा जवळ आलेल्या असतात, अन्य काही कारणं असतात, आजारपणं असतात, वय असतं... याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतो.
त्यामुळे माझी विनंती आहे जे काही कोर्टाच्या नियम आहेत ते पाळून गणेशोत्सव साजरे केले जावेत. त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्कृष्ट समाजप्रबोधन कसा होईल, याचा आग्रह हा प्रत्येक गणेश मंडळाने धरावा.
मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, मला असं वाटतं की पुणे शहरात जशी गणेश मंडळ आहेत, तसे सामान्य नागरिकसुद्धा आहेत. पुणे शहरामध्ये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं नको वाटायला की गणेशोत्सवाला आता दुसरीकडे कुठेतरी 10 दिवस शिफ्ट व्हावं. मला असं वाटतं की हे चुकीचं ठरेल आणि अत्यंत धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा झाला पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं.
त्यामुळे जी डीजे मुक्त गणेश उत्सवासाठी मी प्रयत्न सुरू केले असून याबाबत वारंवार पोलीस आयुक्तशी पण बोलणं होत. नुसता गणेशोत्सवातच नाही तर सगळ्या प्रकारचे उत्सव जे आहेत, हे डीजेमुक्त झाले पाहिजेत. हा धांगडधिंगा, अश्लील गाणी जी धर्माला शोभत नाहीत, जी नागरिकांना असह्य होतात, अशा प्रकारे उत्सव साजरा करण्याची पद्धत योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे.
शहरातील 200 मंडळांनी सांगितलंय की 'आम्ही डीजे वापरणार नाही'. त्यांचं अनुकरण सगळ्याच मंडळांनी केलं पाहिजे, असं मला वाटतं. 'सोलापूर पॅटर्न' आपण म्हणतो पण पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, त्यामुळे पुणे शहराने स्वतःचा एक पॅटर्न निर्माण करावा असं देखील मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.