

Vijay Wadettiwar OBC Certificate Controversy: माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. त्यांनी गुरुवारी (ता. 27) भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, त्याचसोबत सुप्रिया सुळे यांनीही ओबीसी सर्टिफिकेट काढून ठेवलं आहे, असा धक्कादायक विधान वडेट्टीवार यांनी केलं होतं.
तसेच शरद पवार यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे की नाही याची माहिती नाही, असंही ते म्हणाले होते. यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वडेट्टीवार यांच्यावर अक्षरश: तुटून पडला होता. तसेच सुळेंनी वडेट्टीवारांच्या ओबीसी सर्टिफिकेटबाबतच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत हा वाद काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे याबाबत विचारणा करण्याबाबतचा इशारा देताच वडेट्टीवारांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांचा सुप्रिया सुळेंच्या ओबीसी सर्टिफिकेटबाबत केलेला दावा मागे घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा उल्लेख आपल्याकडून अनावधानाने झाला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. त्यावर त्यांनी खेदही व्यक्त केला आहे.
मात्र, विजय वडेट्टीवार यांनी आपले शब्द मागे घेतले असले तरी ओबीसी सर्टिफिकेट घेऊन सत्तेचा लाभ घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत आपली भूमिका बदलली नाही, असंही ठणकावून सांगितलं आहे.
यावेळी वडेट्टीवारांनी माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यांनी हा माफीनामा एका विशिष्ट उल्लेखापुरता मर्यादित असला तरी, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरील त्यांची राजकीय भूमिका कायम असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळेंसह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही वडेट्टीवारांनी ओबीसींबाबतच्या वक्तव्यावरुन फटकारलं आहे. तसेच माफी मागावी अशी मागणीही केली होती.
खासदार सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरती सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेस नेत्याला चांगलंच खडसावलं आहे. सुळेंनी या वक्तव्याप्रकरणी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस रोज उठून हे असे आरोप करते याचं दुःख होतंय असंही सुळेंनी सांगितलं. मी कधीच काँग्रेसला टार्गेट केलं नाही. पण काँग्रेस मला रोज का टार्गेट करते माहिती नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे, आपण कधीही काँग्रेसला टार्गेट केलेलं नाही, उलट नेहमी पाठराखण केली असंही सुळे यांनी म्हटलं.
सुळे पोस्टमध्ये म्हणतात, विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हे त्यांनी जाहीर करण्याचं आव्हानही त्यांनी वडेट्टीवारांना दिलं. तसेच याबाबत मी महाराष्ट्र काँग्रेसलाच विचारावं लागेल, हे दुर्दैवी आहे. मात्र, संवेदनशील गोष्टी बोलताना खबरदारी घेतली पाहिजे. वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे या वादावर पडदा टाकू असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल, तर त्यांनी त्यासंदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावे. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.