Pimpri-Chinchwad News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या आजच्या (ता.11) शहर दौऱ्याची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी परवा (ता.९) बोलावलेल्या पत्रकारपरिषदेत पक्षाच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना कडेला खुर्ची देण्यात येऊन प्रोटोकॉल पाळला गेला नाही. हा जाहीर अपमान सहन न झाल्याने तसेच महिला म्हणून पक्षात वरचेवर दुर्लक्षित केले जात असल्याने त्या शहर सरचिटणीस नामदेव ढाकेंवर प्रचंड भडकल्या. त्यांच्या या अवमानावरुन आता थेट ढाकेंच्या राजीनाम्याचीच मागणी तीन आठवड्यात प्रदेशाध्यक्ष शहर भेटीवर असताना पक्षातूनच बुधवारी करण्यात आली.
एकूणच शहर भाजप कार्यकारिणीत 'ऑल इज नॉट वेल' असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात १७ तारखेला ती जाहीर झाली तेव्हाच काही जुने एकनिष्ठ भाजपाई नाराज झाले होते. तर, भोसरीला तीत अपेक्षित स्थान न मिळाल्याने तेथील पदाधिकारीही संतप्त आहेत. मागच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष असलेले राम वाकडकर या कट्टर अश्विनी जगताप समर्थकाने ढाकेंच्या राजीनाम्याची मागणी पत्रकच काढून आज केली. तसेच आज शहर दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्षांना भेटून त्यांच्याकडे सुद्धा ढाकेंच्या राजीनाम्याची लेखी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या चिंचवडचे भाजपचे (BJP) स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष शंकर जगताप हे त्यांचे दीर आहेत. वाकडकर हे लक्ष्मणभाऊंचे व आता अश्विनी यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांचा अपमान होताच ते प्रचंड आक्रमक झाले. ''भाऊंनीच मोठ्या केलेल्या काही शहर पदाधिकाऱ्यांवर ते तुटून पडले आहेत. लक्ष्मणभाऊंनी शहरातील अनेकांना उंचीपेक्षा अधिक दिले, रंकाचा राव केला. मात्र, त्यांचा काहींना विस्मय झाला आहे,'' अशी तोफ त्यांनी डागली.
जगतापांचा अवमान करणाऱ्या कृतघ्न पदाधिकाऱ्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी लेखी मागणी वाकडकरांनी केली आहे. पत्रकारपरिषदेत आमदार जगतापांना बसण्यासाठी कडेला खुर्ची ठेवण्यात आली. हे ढाकेंनी हेतुपुरस्सर जाणूनबुजून केले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच करून त्यांनी आमदार जगतापांचा जाहीर पानउतारा करून अचूक टायमिंग साधल्यानेच शांत व संयमी असूनही त्या खवळल्या.
त्यामुळे त्यांना मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे, माझ्या नादी लागू नका, पाठीमागुन वार करु नका अशी डरकाळी फोडावी लागली, असे ते म्हणाले. ''असे बालिश चाळे करू पक्षात फूट पाडण्याचा व अंतर्गत कलह माजवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढाकेंचा शहराध्यक्षांनी राजिनामा घ्यावा,'' अशी मागणी वाकडकरांनी केली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.