Shankar Jagtap Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad Bjp : भाजपचे शंकर जगताप निवडणार आपले शिलेदार; पिंपरी-चिंचवड कार्यकारिणीसाठी राजधानीत मोर्चेबांधणी

उत्तम कुटे

Pimpri News : भाजपचे राज्यातील ७० जिल्हाध्यक्ष गेल्या महिन्यात १९ तारखेला जाहीर करण्यात आले. त्यात पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती झाली. ते आपली कार्यकारिणी १५ दिवसांत जाहीर करणार आहेत. त्यांनी ही माहिती ‘सरकारनामा`ला आज (ता. ५) दिली. दरम्यान, नव्या शहर कार्यकारिणीत स्थान मिळावे; म्हणून काहींनी थेट मुंबईपर्यंत मोर्चेबांधणी केली आहे. (BJP's Pimpri-Chinchwad executive will be announced in 15 days)

राज्यातील महापालिकांची निवडणूक ही दिवाळीदरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या कार्यकारिणीला स्थिरस्थावर व्हायला पुरेसा वेळ मिळावा; म्हणून त्या या महिन्यातच जाहीर केल्या जाणार आहेत. पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad) कार्यकारिणी येत्या १५ दिवसांत जाहीर करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. नव्या आणि जुन्यांचा मेळ घातलेली सर्वसमावेश अशी ती असेल.

भोसरी, पिंपरी, चिंचवड या शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघाला त्यात स्थान असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तोंडावर असलेली महापालिका निवडणूक विचारात घेऊन अनुभवी व जुन्या कार्यकारिणीतील काहींना नव्याने पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जगताप हे चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांचे दीर आणि माजी शहराध्यक्ष तथा चिंचवडचे (स्व.) आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू असल्याने चिंचवडला भाजप (BJP) कार्यकारिणीत झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जगतापांबरोबर नियुक्त केलेले राज्यातील ७० जिल्हाध्यक्षही याच महिन्यात आपापल्या कार्यकारिणी जाहीर करतील, असे भाजपच्या प्रदेश पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र, त्यात या वेळी संघटन सरचिटणीस हे अध्यक्षानंतरचे व सरचिटणीसांवरचे पद नसणार आहे. यापदावर आरएसएसशी संबंधित व्यक्ती नियुक्त झाल्याचे किमान उद्योगनगरीत तरी दिसून आले आहे.

आता भाजपने संघटन सरचिटणीस हे पदच रद्द केले आहे. त्यामुळे नव्या कार्यकारिणीत ते नसणार आहे. उद्योगनगरीच्या गत कार्यकारिणीत अमोल थोरात या पदावर होते. मात्र, त्यांनी जगतापांच्या अध्यक्षपदालाच जाहीर विरोध केलेला असल्याने त्यांना नव्या कार्यकारिणीत संधी मिळेल, असे दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT