पुणे

महापौर मोहोळांचा Happy Birthday : पुण्यासाठी ठरणार रक्तदान महासंकल्प दिवस

पुण्यातला रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी आणि शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे पुणे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून केवळ ५-६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्या नऊ नोव्हेंबर हा आपला वाढदिवस ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या (ता. नऊ) शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबर आयोजित केले आहे.पुणे शहराला दररोज ६०० रक्तपिशव्यांची आवश्यकता असून प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात रक्तसंकलन होत नसल्याचे रक्तपेढ्यांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रक्तदानाची आवश्यकता आहे. या अनुषंगाने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने 'रक्तदान महासंकल्प दिवस'अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, 'आपण नेहमीच म्हणतो रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आज संपूर्ण शहरात रक्ताचा मोठा तुटवडा असताना असताना हे श्रेष्ठदान करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध केली आहे. यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ, हार-तुरे, केक, भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करुन द्याव्यात. पुणेकरांनी संपूर्ण कोरोना संसर्ग काळात सामूहिकपणे सामाजिक बांधिलकी जपत कोरोना संकटाचा सामना केला. आता शहराला रक्ताची गरज निर्माण झाली असताना पुणेकर रक्तदान महासंकल्प दिवसाच्यानिमित्ताने एकवटून मोठ्या प्रमाणावर रक्तदान करतील हा विश्वास आहे'

'वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मित्र परिवारासह पक्ष सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देतात. त्या सर्वांना माझी विनंती आहे, यंदाच्या वर्षी शहरातील रक्तपिशव्यांची तूट लक्षात घेता रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत शुभेच्छा द्याव्यात, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव नीलेश कोंढाळकर म्हणाले, 'शुभारंभ लॉन्स येथे रक्तदान शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (मंगळवारी) दिवसभर रक्तदान शिबिर सुरु असून यात नागरिकांनी सहभागी व्हावे. ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली असेल किंवा लसीकरण झाले असेल त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करुन लसीकरणासाठी पुढे यावे'.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT