पुणे शहराच्या विश्रांतवाडी परिसरातील टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्रमांक 8 मध्ये असलेल्या साईकृपा लॉजजवळ बॉम्बसाठी वापरण्यात येणारे जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर वायर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर पिंजून काढला आणि पुढील कार्यवाही सुरू केली.
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टिंगरेनगर येथील विद्यानगर आरोग्य कोठीमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगार झाडलोट करत होत्या. पोत्यात काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचे दिसताच तिने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्या पोत्याची तपासणी केली असता, त्यामध्ये स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी येऊन तपास केला असता, त्या पोत्यामध्ये एकूण 138 जिलेटिन कांड्या आणि 135 डेटोनेटर वायर आढळून आल्या. हा सर्व मुद्देमाल जवळपास 10,920 रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सर्व स्फोटक सामग्री खडक फोडण्यासाठी वापरण्यात येत असून ती एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला घटनास्थळी पाचारण केले. बॉम्बशोधक पथकाने तातडीने हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी केली आहे. पुढील तपास आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सध्या चालू आहे.
या प्रकरणी, धोकादायक स्फोटक साहित्य अत्यंत हलगर्जीपणाने आणि निष्काळजीपणे उघड्यावर ठेवल्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याबद्दल विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राहुल सुदाम वाजे आणि किसन धनवते (दोघेही रा. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस हवालदार यशवंत किरवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल माने करत आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी केले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तिला हात न लावता, त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे महत्त्वपूर्ण आवाहनही त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.