PMC News  Sarkarnama
पुणे

PMC News : पुणे महापालिकेत ‘गिफ्ट’चा खेळ! 22 बॉक्ससह गाडी पोलिस ठाण्यात; आत सापडलं तरी काय?

Builder Gifts PMC Yuva Sena : बिल्डरचे ब्रॅण्डिंग असलेल्या चकचकीत पिशव्या आणि डिझायनर लाकडी बॉक्समधून पुणे महापालिकेत गिफ्टचे वाटप सुरू होते.

Sudesh Mitkar

Pune News : महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘वरं जनहितं ध्येयम्’ अशी पाटी झळकते. मात्र, बुधवारी महापालिका भवनात जनहितापेक्षा ‘गिफ्टहिता’चीच चर्चा रंगली. एका आलिशान मोटारीतून आलेल्या एका बिल्डरचे ब्रॅण्डिंग असलेले गिफ्ट बॅग आणि लाकडी बॉक्सच्या साठ्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या दालनांपर्यंत पोहोचलेले हे गिफ्ट बॉक्स अखेर थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले.

महापालिका भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ गिफ्ट बॉक्स घेऊन आलेली मोटार उभी होती. गाडीची डिकी उघडताच ‘ बिल्डरचे ब्रॅण्डिंग असलेल्या चकचकीत पिशव्या आणि डिझायनर लाकडी बॉक्सचा साठा दिसून आला. त्यानंतर ‘ त्याच ब्रँडिंग चे टी-शर्ट परिधान केलेले कर्मचारी या गिफ्ट बॅग घेऊन महापालिकेतील विविध मजल्यांवर आणि अधिकाऱ्यांच्या दालनांकडे जात असल्याचे दिसले.

या बॉक्समध्ये गणपती बाप्पाच्या शुभेच्छांसह डिझायनर मोदक बॉक्स, घंटी, अगरबत्ती आणि अन्य पूजासाहित्य असल्याचे सांगण्यात आले. काही बॉक्स अधिकाऱ्यांच्या टेबलांवर पोहोचल्याने महापालिका वर्तुळात या गिफ्टची जोरदार चर्चा सुरू झाली.

गिफ्टमागचं कारण कोणता?

महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनात थेट गिफ्ट पोहोचविण्यामागे नेमका उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एखाद्या खासगी कंपनीकडून महापालिका अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने भेटवस्तू देण्यामागे नेमके कारण काय, गिफ्ट कोणासाठी आणण्यात आले होते आणि त्याचे वितरण कोणत्या उद्देशाने केले जात होते, याची चर्चा पालिका भवनात सुरू झाली.

विशेष म्हणजे, संबंधित कंपनीच्या नावाचे टी-शर्ट परिधान केलेले कर्मचारी महापालिका भवनात फिरत असल्याने गिफ्ट वितरणाची बाब अधिकच चर्चेत आली. गिफ्टचा बॉक्स उघडण्यापूर्वीच या प्रकरणातील संशयाची पेटी मात्र उघडली गेली.

२० ते २५ गिफ्ट वाटल्यानंतर पोलिसांत धाव

दरम्यान, सुमारे २० ते २५ गिफ्ट बॉक्सचे वितरण झाल्यानंतर या प्रकाराची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी महापालिका भवनाबाहेर गिफ्ट घेऊन आलेली मोटार अडवून पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असता गिफ्टच्या पिशव्यांमध्ये चांदीच्या वस्तू आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित मोटार आणि २२ गिफ्ट बॉक्स शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

चौकशीची मागणी

या भेटवस्तू नेमक्या कोणासाठी आणण्यात आल्या होत्या, त्यांचे वितरण कोणाला करण्यात आले आणि त्यामागे कोणता उद्देश होता, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

आता महापालिका भवनात दाखल झालेल्या या ‘गिफ्ट बॉक्स’मागचा खर कारण’ पोलिसांच्या चौकशीतून समोर येणार का, याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT