Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Chandrakant Patil: प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील का गडबडले?

Pune News : पत्रकारांशी संवाद साधताना घडला प्रकार

Sudesh Mitkar

Pune : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना पुण्यात गुरूवारी अनोळखी व्यक्तीने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. याबाबत व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी एका अनोळखी व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी पाटील पत्रकारांशी संवाद साधत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत असताना एक व्यक्ती तेथे आली. तिने पाटील यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. तुम्ही पत्रकार आहात का, अशी विचारणा झाल्यानंतर संबधित व्यक्तीने नाही, असे म्हटले. त्यानंतर हा गोंधळ उडाला. पुस्तक प्रदर्शनासाठी आलेल्या चंद्रकांतदादांना वृत्तवाहिनींच्या पत्रकारांनी गराडा घालत विविध प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रश्नांची उत्तरे देत पाटील संवाद साधत असतानाच दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यामुळे चंद्रकांत दादा देखील थोडे गडबडले. त्याचवेळी तुम्ही पत्रकार आहे का, अशी विचारणा केल्यानंतर नाही उत्तर आले. पत्रकार नाही, मग बाजूला व्हा, असे पाटील यांनी त्या व्यक्तीला सुनावले. त्यानंतर ते पुढील प्रश्नांचे उत्तर देत होते. त्याचवेळी संबधित व्यक्ती मोठ्याने आवाज करत असल्याने कोण आहे तो? अशी विचारणा करत या व्यक्तीला तपासण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलिस यंत्रणेला केल्या.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका अनोळखी व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. पिंपरी-चिंचवड परिसरातील मोरया गोसावी मंदिराजवळ हा प्रकार घडला होता. त्यावेळी पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चोख पोलिस बंदोबस्त असताही त्यांच्यावर शाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले होते. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत काही पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना निलंबित देखील केले होते.

का झाली होती शाईफेक?

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील पैठण येथील कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात होता. 'पाटील यांना शहरात पाऊल ठेवू देणार नाही', असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. त्यानंतर चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या कार्यक्रमासाठी पाटील येणार होते. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र याच कार्यक्रमात सुरक्षाव्यवस्था भेदत त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

(Edited By - Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT