Pune News : नाशिक मतदारसंघ कोणाचा यावरून महायुतीत वाद रंगला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. या वादात कोणाची सरशी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. येथून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी अपेक्षित होती. यातच मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारी देण्यासंदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशांची पायमल्ली करीत राज्यातील महायुती सरकारने आठवड्यापेक्षा जास्त कालावधी घेऊन कोणताही निर्णय न घेतल्याने त्याचा लाभ महायुतीच्या विरोधी उमेदवाराला होत आहे. (Chhagan Bhujbal News)
यातून उद्विग्न होत मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, यामुळे राज्यातील ओबीसींना डावलले जात असल्याची भावना संपूर्ण राज्यातील ओबीसी बांधवांच्या मनात निर्माण झाली आहे, असा आरोप महात्मा फुले समता परिषदेने केला आहे.
"मी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर विश्वास दाखवत उमेदवारीबाबत आग्रह धरला, त्यासाठी आभारी आहे," असं भुजबळांनी म्हटलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर आता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे तीव्र जाहीर निषेध केला आहे. याबाबत आज पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यासाठी छगन भुजबळ यांना भाग पाडण्यात आले असल्याची भावना महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
महायुतीच्या या दिरंगाईविषयी भुजबळ यांच्या विरिधकांना वेळ मिळाला. त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण करण्यात आले. जर वेळेत उमेदवारी जाहीर केले असती तर भुजबळ यांना निवडणूक लढवण्यासाठी वेळ मिळाला असता, असे अध्यक्ष पुणे विभाग प्रीतेश गवळी यांनी सांगितले.
(Edited By : Sachin Waghmare)
R