Chinchwad By Election Sarkarnama
पुणे

Chinchwad By-Election : भाजपचं टेन्शन वाढणार; महेश लांडगेंच्या ट्विटर पोलमध्ये राष्ट्रवादीच्या काटेंना पसंती

नाना काटे यांना सायंकाळी साडेसातपर्यंत ६ हजार ३०४ लोकांनी पसंती दिली असून त्याची टक्केवारी ४३ टक्के एवढी आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यात सध्या कसबा आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (By Election) प्रचार शिगेला पोचला आहे. दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाची (BJP) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातूनच भाजपला आजारी असलेले गिरीश बापट यांना प्रचाराला उतरावे लागले. दुसरीकडे, चिंचवड पोटनिवडणुकीचा कानोसा पोलच्या माध्यमातून भाजप नेते घेताना दिसत आहेत. आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आपल्या ट्विटवर टाकलेल्या ‘सिटीझन’ आणि ‘वोटर’ पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार नाना काटेंना (Nana Kate) पोटनिवडणुकीत पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. (Chinchwad by-election : Mahesh Landge's Twitter poll favors goes to Nana Kate)

पुण्यातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला तोडीस तोड उमेदवार देत रंगत आणली आहे. कसब्यात काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहेत, त्यांची लढत भाजपच्या हेमंत रासने यांच्याशी होत आहे. मात्र, धंगेकर यांचा जनसंपर्क पाहून भाजपला खासदार बापट यांना प्रचारात उतरावावे लागले आहे. याच मतदारसंघात भाजपची सर्व शक्ती अडकून पडली आहे. बहुतांश मंत्री याच मतदारसंघात प्रचारात आहेत.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सध्या चिंचवड पोटनिवडणुकीची जबाबदारी आहे. भाजपचे नेते कसब्याच्या प्रचारात गुंतलेले असताना लांडगे हे चिंचवडचा किल्ला एकहाती लढवत आहेत. त्यांनी सुमारे चार तासांपूर्वी पिंपरी चिंचवडचा आमदार कोण होणार? असा पोल घेतला आहे. तो पोल वोटर आणि सिटीझन पोल आहे. त्यामुळे यामध्ये मतदारांबरोबरच नागरिकांचाही समावेश असू शकतो.

दरम्यान, आमदार लांडगे यांनी टाकलेल्या पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे हे पुढे आहेत. त्यांना सायंकाळी साडेसातपर्यंत ६ हजार ३०४ लोकांनी पसंती दिली असून त्याची टक्केवारी ४३ टक्के एवढी आहे. भाजपच्या उमेदवार तथा लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४ हजार ५४१ मतदारांनी पसंती दिली असून ३१ टक्के मते मिळाली आहेत. या पोलमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनाही लक्षणीय लोकांची पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे. सुमारे ३ हजार ४३८ मते त्यांना मिळालेली असून त्याची टक्केवारी २४ टक्के इतकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT