Avinash Bhosale
Avinash Bhosale sarkarnama
पुणे

राज्यातील बड्या नेत्यांनी वापरलेले हेलिकाॅप्टर `सीबीआय`कडून जप्त!

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : राज्यातील आणि परराज्यातील अनेक नेत्यांनी सहजरित्या वापरलेले हेलिकाॅप्टर आज सीबीआयने जप्त केले. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांचे हे हेलिकाॅप्टर आहे. तब्बल 34 हजार कोटी रुपयांच्या डीएचएफल घोटाळ्यातील (DHFL Scam)आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. त्यात भोसले यांचा सहभाग आढळल्याने त्यांचे हे हेलिकाॅप्टर पुण्यातील बाणेर येथून जप्त केले. विमानतळावर असलेल्या हॅंगरप्रमाणे एका मोठ्या हाॅलमध्ये हे हेलिकाॅप्टर दडवून ठेवण्यात आले होते. ते सीबीआयने शोधून काढले.

या घोटाळ्यातून या आरोपींनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता आरोपींनी खरेदी केल्या. त्याचा शोध सीबीआय घेत आहे. या आधी ईडीने भोसले यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयाचा ताबा घेतला आहे. भोसले यांचे हे हेलिकाॅप्टर ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीचे आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांना हे हेलिकाॅप्टर सहज उपलब्ध होत होते. अनेकांनी भोसले यांची ही सेवा घेतली आहे.

डीएचएफएलचे माजी प्रमुख कपिल वाधवान, दीपक वाधवान यांच्याविरोधात सीबीआयने 20 जून रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांनी सतरा बॅंकांचे एकून 34 हजार 615 कोटी रुपये बुडविल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या बॅकांकडून कर्ज म्हणून मिळालेली रक्कम अनेक शेल कंपन्यांत गुंतविण्यात आली. डीएचएफएलने अनेकांना बोगस कर्जे दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या आधी वाधवान यांच्या महाबळेश्वर येथील निवासस्थानातून सुमारे एक कोटी रुपयांची 25 अलिशान घड्याळे आणि 38 कोटी रुपयांची चित्रे जप्त करण्यात आली होती.

भोसले यांना वाधवान यांनी सुमारे 300 कोटी रुपये दिले होती. त्यातून भोसले यांनी लंडन येथील मालमत्ता खरेदी केली. तसेच ABIL कंपनीला 43 कोटी आणि मेट्रोपोलिस हाॅटेल कंपनीला 140 कोटी रुपये कर्ज म्हणून दिल्याचे दाखवले होते. प्रत्यक्षात ही रक्कम कर्ज नव्हती तर दलाली होती, असे सीबीआयने म्हटले आहे. यस बॅंकेचे राणा कपूर आणि भोसले यांच्या खात्यात वाधवान यांनी रक्कम वळवली होती, असे सीबीआयच्या निदर्शनास आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT