Baramati, 24 June : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आता सर्वसाधारण ऊस उत्पादक गटाची मतमोजणी सुरू आहे. सर्वाधिक रस्सीखेच याच मतदारसंघात आहे. कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद या मतदारसंघासाठी मतदान करीत आहेत. सर्वसाधारण ऊस उत्पादक मतदारसंघातील माळेगाव गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे तीनही उमेदवार आघाडीवर आहेत. सर्वाधिक रस्सीखेच अजित पवारांचे खंदे समर्थक तथा कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि रंजन तावरे यांच्या दिसून येत आहेत. यात बाळासाहेब तावरेंनी सध्या 53 मतांची आघाडी घेतलेली आहे.
सर्वसाधारण ऊस उत्पादक मतदारसंघाचा माळेगाव गट हा तुलनेने पवारविरोधी म्हणून ओळखला जातो. याच गटातून विरोधी सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे (Ranjan Taware) निवडणूक लढवत आहेत. मात्र विरोधकांच्या बालेकिल्ल्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तीनही उमेदवार आघाडीवर आहेत. ही आघाडी आता कायम राहणार की विरोधक बाजी मारणार, याकडे सर्व बारामतीचे लक्ष लागले आहे.
माळेगाव गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नीळकंठेश्वर पॅनेललचे रंजित जाधवराव यांना 396 मते मिळाली आहेत, तर विरोधी तावरे गटाचे उमेदवार गजानन काटे यांना 250 मतं मिळाली आहेत, अजितदादांच्या पॅनेलचे रंजीत जाधवराव हे 146 मतांनी पुढे आहेत. तसेच, पवार गटाचे राजेंद्र बुरुंगले यांना 321 मते मिळाली आहेत, तर तावरे गटाचे रमेश गोफणे यांना 197 मतं मिळाली आहेत, राजेंद्र बुरुंगले हहे124 मतांनी पुढे आहेत.
सर्वाधिक लक्षवेधी लढत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या दोन माजी अध्यक्षांमध्ये आहेत. अजित पवार गटाचे प्रमुख उमेदवार आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांना विरोधी गटाचे प्रमुख उमेदवार रंजन तावरे यांनी चॅलेंज दिले आहे. पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत अजितदादांचे खंदे समर्थक बाळासाहेब तावरे यांना 366 मते मिळाली आहेत, तावरे गटाचे प्रमुख असललेले रंजन तावरे यांना 313 मते मिळाली आहेत. त्यात बाळासाहेब तावरे 53 मतांनी पुढे आहेत.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजितदादांना सोसायटी मतदारसंघातून 91 मते मिळाली आहेत, त्यांचे विरोधक सहकार बचाव पॅनेलचे भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाली आहेत. अजित पवार यांनी तब्बल 81 मते अधिक मिळवित विजय मिळविला आहे.
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये अजित पवार यांच्या पॅनेलमधील उमेदवार रतनकुमार भोसले यांना 3440 मते मिळाली आहेत, तर तावरे गटातील बाबूराव गायकवाड यांना 3094 मते मिळाली आहेत. अजित पवार गटाचे रतनकुमार भोसले हे 376 मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजेच या राखीव गटातसुद्धा तुल्यबळ सामना होत असल्याचे दिसून येत आहे.
इतर मागास प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनेलचा उमेदवार आघाडीवर आहे. इतर मागास प्रवर्गातील 1800 मते आतापर्यंत मोजली आहेत. इतर मागास प्रवर्गातून अजित पवार गटाच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलचे नितीन शेंडे हे सुमारे 262 मतांनी आघाडीवर आहेत. आता ही आघाडी शेंडे कुठपर्यंत टिकवून ठेवणार, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.