amol mitkari sarkarnama
पुणे

अमोल मिटकरींना मंत्रोच्चारण करणं पडलं महागात ; पुण्यात तक्रार दाखल

मिटकरी यांची मंत्रोच्चारण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : ब्राम्हण समाजाबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (ncp mla amol mitkari) यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे. मिटकरी यांची मंत्रोच्चारण आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता युवा मंचचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी मिटकरींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ''मिटकरी यांनी चिथावणीखोर भाषण करून ब्राह्मण समाजातील लोकांच्या भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण केली,'' असे कुणाल टिळक यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला इस्लामपूरमध्ये सुरुवात झाली. त्यावेळी झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. भाजप आणि हिंदुत्त्वाची संघटनांनी अमोल मिटकरींच्या विधानाचा निषेध केला. मिटकरींच्या मंत्रोच्चारणाचा निषेध करत ब्राम्हण महासंघाने काल (गुरुवारी) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आंदोलन केले. यावेळी या आंदोलकांचा मिटकरी यांच्याविरोधात कमालीचा रोष दिसून आला. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे.

'मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललो नाही. ज्यांना वाटत असेल मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे' असं म्हणत अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. मिटकरीच्या या विधानावर भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी टीका केली आहे.गिरीश महाजन म्हणाले, ''आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये. अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे,''

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''मेंटल मिटकरींबाबत काय बोलणार? अशा शब्दात राजू पाटील यांनी मिटकरींची खिल्ली उडवली आहे. राजू पाटील म्हणाले, ''त्या मेंटल माणसाबद्दल काय बोलायचं, आज शरद पवार यांनी देखील मिटकरी यांच्या वक्तव्या बाबत बोलताना तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं सांगितलं. मात्र एकूणच तुम्ही तुमच्या गोष्टी वदवायला तुमचं व्यासपीठ उपलब्ध करून देता. मिटकरींनी हे विसरू नये की लोकं मूर्ख नाहीत,''मिटकरी फिटकरी यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आम्हाला लाजल्यासारखं होतं मूर्खांबद्दल काय बोलणार असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT