Pune News : आमदार मुक्ता टिळकांच्या निधनानंतर झालेल्या कसबा पोटनिवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या ताब्यातून कसबा खेचून आणत मोठं यश मिळवलं होतं. पण भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी त्यांना धोबीपछाड दिला. त्यानंतर भाजपनं विधानसभा निवडणुकीतही कसब्यात आपली पूर्ण ताकद पणाला लावत धंगेकरांचा पराभव केला. लवकरच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कसब्यातील पराभवानंतर आता रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहे.यातच आता काँग्रेसचे दोन मोठे नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुरुवारी(ता.30) भेट घेतली आहे.यात हुसेन दलवाई आणि पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर काँग्रेस पक्षावर काहीसे नाराज असल्याची चर्चा होती.
अखेर पुणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.यातच आता रवींद्र धंगेकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांची शिवसेना प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी पोटनिवडणुकीतील पराभवातून धडा घेत मतदारसंंघात झोकून देऊन काम केलं. त्याचमुळे नुकत्याच कसबा मतदारसंघात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत भाजपच्या रासने यांनी विजय मिळवला.या पराभवानंतर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या या चुकीवरही बोट ठेवलं आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुण्यातील कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत विजय खेचून आणला होता. त्यानंतर धंगेकर हे काँग्रेस पक्षाचा पुण्यासह राज्यातील प्रमुख चेहरा झाले होते. त्यातच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला. यानंतर विधानसभा निवडणुकीत धंगेकरांचा रासने यांनी तब्बल 19 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आगामी मुंबई आणि पुणे महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असून, सासवड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये पक्षप्रवेश करून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि मनसेला दणका दिला जाणार आहे. आता शिंदे धंगेकरांना पक्षात आणून काँग्रेसलाही धक्का देणार का याची चर्चा जोर धरु लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.