Nana Patole
Nana Patole Sarkarnama
पुणे

त्या इशाऱ्यानंतर नाना पटोले आठवडाभरातच बारामती मतदारसंघात!

मनोज कुंभार

वेल्हे : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या उपस्थितीत होणारा वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकदा नव्हे तर दोनवेळा रद्द झाला. पण त्याच वेल्ह्यात येत्या गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांची तोफ धडाडणार आहे. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने ते वेल्ह्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) विदर्भात गेल्यानंतर ‘आम्ही बारामतीत आलो तर वाईट वाटून घेऊ नका,’ असा इशारा पटोलेंनी दिला होता. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच ते बारामती लोकसभा मतदारसंघात मेळावा घेत आहेत. त्यामुळे ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Congress Farmers Meet in Velhe in the presence of State President Nana Patole : Sangram Thopte)

वेल्हेत विविध कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन काँग्रेसकडून करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे असणार आहे. या मेळाव्याची आणि पटोले यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

वेल्हे पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असून दोन्ही जिल्हा परिषद सदस्यही काँग्रेसचेच आहेत. भोर-वेल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विविध विकास कामांच्या श्रेयावरून वाद सुरू असताना आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक समोर ठेऊन काँग्रेसचा हा मेळावा म्हणजे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कुरंगवडी ते अंबवणे रस्त्या दुरुस्ती एक कोटी पन्नास लाख, लाशीरगाव कातूर्डेवाडी येथील पुलासाठी ८० लाख, तर वेल्हे केळदकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी १५ कोटी ५१ लाख व इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन पटोले यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा १२ नोव्हेंबर रोजी वेल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार होता. तो रद्द झाला, त्यानंतर १९ नोव्हेंबरला तो कार्यक्रम होणार असल्याची चर्चा होती. मात्र, तोही रद्द झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारे अनेक प्रवेश रखडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोलेंच्या या सभेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह निर्माण झाला आहे.

वेल्हे येथील मेंगाई मंदिराच्या प्रांगणात मेळाव्यासाठी मंडप उभारणी चालू असून पाच हजाराहून अधिक लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरू असून तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक या कामासाठी झटत आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भोर विधानसभा मतदार संघात मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये आलबेल नाही. त्यामुळे पटोले व माजी मंत्री अनंतराव थोपटे काय बोलतात याकडे वेल्हे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

वेल्हे तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. आमदारकी, वेल्हे पंचायत समिती आणि दोन्ही जिल्हा परिषद सदस्य हे काँग्रेसचे आहेत. जिल्हा परिषद व खासदारकी ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या दोन्ही पक्षाच्या श्रेयवादात १६ कोटींचा निधी मंजूर असलेल्या प्रशासकीय इमारतीची जागा व मढे घाट कोणत्या मार्गाने होणार यावर एकमत न झाल्याने ही कामे रखडली आहेत.

मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीस पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, लाला रेणुसे, राजगड सहकारी कारखान्याचे संचालक व वेल्ह्याचे सरपंच संदीप नागिने, विष्णू राऊत, वांगणीचे उपसरपंच शिवाजी चोरघे, मार्गसनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे, बापू आलगुडे आदींसह तालुक्यातील काँग्रेसचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT