Mahayuti Banar sarkarnama
पुणे

Yashwantrao chavan : मोदी-शहांसोबत काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाणांचा फोटो!

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो महायुतीच्या बॅनरवर लावण्यास सुरुवात झाली आहे.

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपसह शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) यांनी एकत्र येऊन महायुतीचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांची मेळावे एकत्रीत घेतले जाणार आहेत. या मेळाव्याच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बरोबरीने आता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री अशी विविध पदांची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांनी सांभाळली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अखेरपर्यंत ते सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या शरद पवार (sharad pawar) यांनी नेहमीच यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानले होते. काँग्रेसचे नेते असलेले यशवंतराव चव्हाण यांचा फोटो महायुतीच्या बॅनरवर लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रतिनिधित्व म्हणून हा फोटो आहे.

राजकारणामध्ये आपण यशवंतरावांच्या आदर्शवर चालत असल्याचे नेहमीच पवार यांनी जाहीर भाषणांमध्ये सांगितलेले आहे. शरद पवारांना राजकारणात आणणारे देखील यशवंतराव हेच होते. शरद पवार यांना ते आपला वारसदार मानत असे. राष्ट्रवादी काँग्रेस ही यशवंतरावांच्या विचाराने चालत असलेला पक्ष असल्याने राष्ट्रवादीच्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांचे फोटो दिसत असायचे.

सात ते आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली. अजित पवार यांनी पक्षातील वरिष्ठ मंडळींना घेऊन आपला गट स्थापन केला. केंद्रात सत्ताधारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामाने प्रभावित होत अजित पवार यांनी राज्यात भारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकार पाठिंबा जाहीर करत थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या बॅनरवर अद्याप पर्यंत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची फोटो दिसत नव्हते. मात्र, आता त्यांनी शरद पवारांचे आदर्श, गुरू यशवंतराव यांचा फोटो लावण्यास सुरुवात केली आहे.

शरद पवारांनी केला होता विरोध

अजित पवार गटाकडून सुरुवातीच्या काळात शरद पवार यांचे फोटो आपल्या बॅनरवर लावले होते. मात्र ज्यांच्या विचारांच्या विरोधात लढायचे त्यांच्याशीच जाऊन सत्ता स्थापन करणाऱ्यांनी किमान मी जिवंत असे पर्यंत तरी माझे फोटो वापरू नये, असे सुनावत थेट कोर्टात जाण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर अजित पवार गटाच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो पाहायला मिळत होते.

विचारधारा हायजॅक

काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी ज्या विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्या विचारधारेने काम केले. तिच विचारधारा आता अजित पवार गटाकडून 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात आहे काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT