Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना भाजपची ऑफर? ; 'या' नेत्याच्या विधानाने जोरदार चर्चा!

Sudesh Mitkar

Pune Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. आपला संभाव्य उमेदवार कोण असेल, याची चाचणी वरिष्ठ पातळीवर करण्यात येत असून काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर हे नाव प्रकर्षाने समोर येत आहे. अशातच भाजपाचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी धंगेकर भाजपात आले तर त्यांचे स्वागत असेल, असे सांगत धंगेकरांना एकप्रकारे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफरच दिल्याचं बोललं जात आहे.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भाजपाच्या विविध नेत्यांनी महाआरतीचे आयोजन केले आहे. अशाच प्रकारच्या आरतीचे आयोजन भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी केलं होतं. यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी त्यांना रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी राम मंदिर कार्यक्रमानिमित्त शहरात आयोजिलेल्या महाआरतीबाबत विचारले असता काकडे म्हणाले, रवींद्र धंगेकरच नाही तर सबंध देश सध्या राममय झाला आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा का नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र भाजपमध्ये त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केल्यास आम्ही स्वागत करू. परंतु रवींद्र धंगेकर सध्या काँग्रेसमय झाले असून ते येतील असं वाटत नाही, तरीही ते आल्यास त्यांचे नक्कीच स्वागत केले जाईल, असं काकडे म्हणाले.

दरम्यान, मागील पुणे महापालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये संजय काकडे हे धंगेकर यांना भाजपमध्ये घेण्यास आग्रही होते. त्यांनी त्या प्रकारची तयारीदेखील केली होती आणि वरिष्ठ नेत्यांनादेखील धंगेकर यांना भाजपमध्ये घेणं किती योग्य आहे, हे पटवून दिलं होतं, मात्र धंगेकर यांच्या भाजप प्रवेशापूर्वी पुण्यातील स्थानिक काही नेत्यांनी धंगेकरांच्या प्रवेशाला विरोध केला होता.

त्यामुळे ऐनवेळी धंगेकरांना काँग्रेसचा एबी फॉर्मदेखील मिळू शकला नाही. परिणामी काँग्रेस पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले. मात्र हा विजय साकार करताना त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ आणि त्यांच्या पक्षप्रवेशांमध्ये आडकाठी घालणाऱ्या नेत्याचा मोठा पराभव केला होता. त्यामुळे धंगेकरांना या निवडणुकीत जायंंट किलर म्हणून पाहिले गेले.

दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संजय काकडे धंगेकर यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सध्याच्या पार्श्वभूमीवर धंगेकर भाजपमध्ये प्रवेश करणार का आणि भाजपमधील स्थानिक नेते त्यांचा हा प्रवेश होऊ देणार का? हा मोठा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT