Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेची रवीभाऊंना भुरळ !

Sudesh Mitkar

Pune News : राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना लागू केली आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायला मिळत आहेत.

भाजपसह महायुतीतील पक्ष लाडकी बहिणी या योजनेची गुणगान गात असतानाच काँग्रेससह विरोधकांकडून या योजनेवर टीका करण्यात येत आहे. अशातच पुण्यातील काँग्रेस आमदाराने लाडक्या बहीण योजनेचे लावलेले पोस्टर सध्या चर्चेत आहेत.

राज्य सरकारने (State Goverment) आणलेली लाडकी बहीण ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरू शकते.या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. याचा फायदा मोठ्या प्रमाणात महिला वर्गांला होणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून ही योजना फक्त सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महिलांची मत घेण्यासाठी लागू केली असल्याची टीका करण्यात येत आहे.

विरोधी पक्षाकडून सातत्याने या योजनेमधल्या त्रुटी निदर्शनास आणून देण्यात येत आहेत.सत्ताधारी या योजनेचे फायदे गिणवत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या योजनेचा जास्तीत जास्त कशाप्रकारे फायदा करून घेण्यात येईल याकडे सत्ताधारी पक्षाचे लक्ष आहे.

यातूनच आगामी विधानसभा निवडणूक महायुती कडून लढवण्यास इच्छुक उमेदवारांकडून आपल्या मतदारसंघांमध्ये लाडकी बहीण योजना राबवणे संदर्भातील माहिती पुरविण्यात येत आहे. तसेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कागदपत्रांची जुळवणी करण्यासाठी महिलांना सहाय्य करण्यात येत आहे.

पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील लाडकी बहीण योजनेचे पोस्टर सबंध कसबा विधानसभा मतदारसंघात लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून योजनेचे फायदे तसेच लागणारी कागदपत्र याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

त्या पोस्टरवर रवींद्र धंगेकर यांचा मोठा फोटो तसंच त्यांच्या पत्नीचाही फोटो पाहायला मिळत आहे. पोस्टरच्या वरच्या बाजूस काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे फोटो आहेत.

विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये मुख्यमंत्र्यांचा अथवा राज्य सरकार मधील कोणत्याही नेत्यांचा फोटो लावणं धंगेकर यांनी टाळले आहे. ही योजना राबवून त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कसा मिळेल, या हेतूने ही पोस्टरबाची रवींद्र धंगेकर यांनी केल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लाडकी बहीण ही योजना जितकी महायुतीच्या नेत्यांना महत्त्वाची वाटत आहे. तेच महत्त्व काँग्रेस च्या नेत्यांना देखील वाटत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT