pune politics Sarkarnama
पुणे

MNS Strategy : वारं फिरलं..! काँग्रेसला राज ठाकरेंच्या आघाडीतील एन्ट्रीला केलेला विरोध भोवणार; मनसे मोठा बदला घेण्याच्या तयारीत

Pune Municipal Corporation Election : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील मनसेच्या एन्ट्रीसाठी पूर्ण वजन वापरलं, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही राज ठाकरेंना सोबत घेण्यास सहमती दर्शवूनही काँग्रेस आपल्या नकारावर ठाम राहिल्याचं दिसून आलं होतं.

Deepak Kulkarni

Pune News : बहुचर्चित मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रमुख अशा 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना,उद्धव ठाकरेंची शिवसेना,राज ठाकरेंची मनसे,काँग्रेस,अजित पवार-शरद पवारांची अशा दोन्ही राष्ट्रवादींसह सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती. पण तरीही काँग्रेसनं मनसेबाबत आडमुठी भूमिका महाविकास आघाडीतील राज ठाकरेंची एन्ट्री रोखली होती. यानंतर आता राज यांनी उद्धव ठाकरेंशी जुळवून घेतल्यानंतर मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि मनसे (MNS) युतीची घोषणा झाली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील मनसेच्या एन्ट्रीसाठी पूर्ण वजन वापरलं, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही राज ठाकरेंना सोबत घेण्यास सहमती दर्शवूनही काँग्रेस आपल्या नकारावर ठाम राहिल्याचं दिसून आलं होतं. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेसनंही स्वबळाचा नारा दिला आहे. आता काँग्रेसला हाच विरोध चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमुळे महायुतीसह महाविकास आघाडीतील स्वबळाचा दिलेल्या काँग्रेसचीही धडधड वाढली आहे. त्यातच आता मनसे काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं तगडं आव्हान समोर असलेल्या काँग्रेसचं (Congress) गणित बिघडवण्यासाठी मनसे आता महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात व रणनीतीसाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पुण्यात शुक्रवारी(ता.26) हॉटेल शांताई येथे पार पडली. या बैठकात मनसे सहभागी झाली नव्हती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून पुण्याच्या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास राज ठाकरेंचा पक्ष इच्छुक नसल्याची माहिती मनसेच्या प्रमुख नेत्यानं दिली आहे.

पुणे मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी महाविकास आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट करताना मोठं भाष्य केलं.त्यांनी एका शहरात आघाडी आणि दुसऱ्या शहरात आघाडी नाही हे जनतेच्या पचनी पडणार नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. आघाडी असेल तर ती सर्व महाराष्ट्रासाठी असेल,तर ते योग्य राहील अशी भूमिका मनसे प्रमुखांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक नसल्याचंही अजय शिंदे यांनी स्पष्ट केलं.

मनसेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आमदार दिल्यानंतर 2012 च्या महापालिका निवडणुकीत 29 नगरसेवक निवडून आणण्याची किमया राज ठाकरेंनी साधली होती. त्यामुळे मुंबईनंतर पुण्यातही मनसेचा काही प्रभागांमध्ये चांगला प्रभाव दिसून आलेला आहे.

तसेच राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेला,तसेच आंदोलनाला पुण्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचंही अनेकदा पाहायला मिळालं आहे.त्यामुळे पुणे महानगरपालिकेत सध्या जरी मनसेची ताकद कमकुवत असली तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीनंतर मनसे भाजप,अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसलाही धक्का देऊ शकते असं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT