Praniti Shinde
Praniti Shinde Sarkarnama
पुणे

Praniti Shinde on BJP : महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री काँग्रेस देईल; प्रणिती शिंदेचा दावा

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : सध्याच्या शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही. हा धागा पकडून जेव्हा अर्थ, गृहसारखे महत्वाचे खाते किंवा मुख्यमंत्रीच महिला होईल, तेव्हा खरा पुरोगामी महाराष्ट्र असेल, असं काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री हा काँग्रेस पक्ष देईल, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात पक्षाने देशभर 'जय भारत सत्याग्रह' अभियान सुरु केले आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय जिल्ह्यात आज पत्रकापरिषद घेण्यात आली.

पिंपरी-चिंचवडची ही जबाबदारी राज्याचे माजी मुख्यंमत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि पक्षाच्या युवा नेत्या प्रणिती शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ती त्यांनी आज पार पाडली.

भाजपच्या मानसिकतेुळे देश प्रोगेसिव्ह (पुरोगामी) नाही, तर रिग्रेसिव्ह (प्रतिगामी) होत असल्याची कडवट टीका त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी हे सावरकरांविषयी वादग्रस्त विधाने सारखी का करीत आहेत, असा प्रश्न विचारला असता राहुल यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. त्यांना सावरकरांची विचारसरणी पटत नाही. दोन विचारसरणीतील हा फरक असून त्यातून हे घडत असावे, असे त्या म्हणाल्या.

राहुल गांधींनी मोदी आडनावावरून विधान केल्याने त्यात त्यांना दोन वर्षाची शिक्षा होऊन त्यांची खासदारकी गेली. अशी अनेक बदनामीकारक, आक्षेपार्ह विधाने भाजपने गांधी घराण्याविषयी वारंवार करूनही त्यांच्याविरुद्ध एकही खटला का दाखल केला नाही, असे विचारले असता भाजपसारखे खालच्या पातळीचे राजकारण आम्ही करीत नाही, असे उत्तर प्रणिती शिंदे यांनी दिले.

राहुल यांना शिक्षा फर्मावणाऱ्या सुरत येथील न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला असल्याने लगेचच त्याला आव्हान दिले नाही. मात्र, आता ते दिले जाईल, असे त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT