Sharad Pawar | Nana Patole Sarkarnama
पुणे

Assembly Election 2024 : मावळची जागा आपल्याकडे खेचण्याची काँग्रेसला संधी? असं असेल विधानसभेचं 'गणित'

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Politics : राज्यात, ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार मावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, राष्ट्रवादीत दोन गट झाल्यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार पक्षाची मावळमधील ताकद कमी झाली आहे.

एकसंघ असलेल्या काँग्रेस पक्षाला लोकसभेतील यशाने मोठे बळ दिले आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीचे काम केले. आता या सर्व बाबींचे एकत्रित फळ म्हणून विधानसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ताकद लावल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीतील फुटीमुळे मावळात 'बॅक'फूटवर असलेल्या काँग्रेसला ( Congress ) यावेळी विधानसभा निवडणुकीत मोठी संधी चालून आली आहे. पण, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेली ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रसला जोर लावावा लागणार आहे.

मावळातील पदाधिकाऱ्यांना पुण्यातील बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana Patole ) यांना येथील राजकीय स्थिती पटवून द्यावी लागणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.

याबाबत मावळ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीकडे लक्ष वेधले. "सध्या पक्ष फुटीने मावळातील सर्व राजकीय समि‍करणे बदलली आहेत. मावळातील लोणावळा, देहू, तळेगाव दाभाडे अशा मोठ्या शहरात काँग्रेसची ताकद मोठी आहे. तर, राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) पक्षाची तशी स्थिती नाही. ग्रामीण भागात पाचही जिल्हा परिषद गटांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. एकंदरीत एकसंघ असलेल्या काँग्रेसला मावळात मानणारा मोठा वर्ग आहे," असं यशवंत मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

"मावळात पूर्वीपासून काँग्रेसची सत्ता होती. मात्र, काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यानंतर येथील काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले आणि येथून भाजपचे आमदार निवडून आले. काँग्रेसने मात्र 1999 ते 2019 पर्यंत मावळात आघाडीचा धर्म पाळला. राष्ट्रवादीचे खासदार, आमदार निवडून आले नाहीत. 2019 मध्ये राष्ट्रवादीने भाजपचे सुनील शेळके यांना संधी दिली. मात्र, आघाडीत कायम सोबत असलेल्या काँग्रेसच्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केले," असंही मोहोळ यांनी सांगितलं.

मावळ काँग्रेसने तालुका स्तरावर हालचाही सुरू करून पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. सध्या मावळ मतदार संघातून लढण्यासाठी काँग्रेसचे चार जण दावेदार आहेत. त्यात प्रदेश प्रतिनिधी दिलीप ढमाले, प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ आणि उद्योजक रामदास काकडे यांचा समावेश आहे. आता मावळची जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी पुण्यातील बैठकीत चर्चा करणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT