Nitin Gadkari, Sunil Shelke  Sarkarnama
पुणे

Nitin Gadkari News : तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा; गडकरींनी दिला आमदार शेळकेंना शब्द

सरकारनामा ब्यूरो

Pune News : आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राहिलेले विकास कामे त्वरित पूर्ण करण्याकडे सर्वांचा कल दिसून येत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नुकतेच मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत साकडे घातले.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झालेच म्हणून समजा, असा शब्द केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मावळचे आमदार सुनील शेळके आणि महामार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाला रविवारी नागपूर येथे दिला. (Nitin Gadkari News)

वारंवार होणारे जीवघेणे अपघात, रोजचीच वाहतूक कोंडीसह गेली अनेक वर्षे कागदी फेऱ्यात अडकल्याने रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती द्यावी, यासंदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यासह तळेगाव- चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण, गणेश बोरुडे आदींनी नागपूर येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

कृती समितीकडून दिलेल्या निवेदनात प्रस्तावित एनएच 548-डी तळेगाव-चाकण-शिक्रापूर सहा पदरी उन्नत महामार्गाच्या (एलिव्हेटेड कॉरिडॉर) भूसंपादनाची सनद प्रसिद्ध करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. या सदर महामार्ग एमएसआईडीसीकडे (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) वर्ग करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

त्यासोबतच प्रस्तावित उन्नत महामार्गाचे काम पूर्ण होण्यास लागणारा मोठा कालावधी पाहता, तोपर्यंत तात्पुरती उपयोजना आणि विशेष बाब म्हणून किमान अस्तित्वातील 54 किलोमीटर रस्त्याचे अतिक्रमण काढून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे दुभाजकावर चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी कृती समितीकडून गडकरी यांच्याकडे करण्यात आली.

त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दाखवली आहे. यावेळी त्यांनी "तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा" असे गडकरी यांनी शिष्टमंडळाला सांगत सदर रस्त्याच्या कामाला प्राधान्याने गती देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT