Pooja Khedkar Audi Sarkarnama
पुणे

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या 'कार'नाम्यातील ऑडी पोलिसांच्या ताब्यात

Sudesh Mitkar

Pune News, 14 July : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या 'कार'नाम्यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांचा शाही थाट समोर आल्यानंतर रोज नवनवे खुलासे त्यांच्याबाबत समोर येत आहेत.

त्यांनी यूपीएससी परीक्षा देताना सादर केलेलं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भवऱ्यात आहे. तसेच परवानगी नसताना देखील त्यांनी त्यांच्या खाजगी गाडीवरती अंबर दिवा लावला होता. आता ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी गाडी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतली असून चतुर्श्रुंगी पोलिस चौकी येथे तिला बॅरिकेटिंग करून ठेवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांनी याच गाडीला अंबरदिव्यासह महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना कागदपत्रांसह गाडी घेऊन पोलीस स्टेशनला हजर होण्याचं समन्स दिलं होतं.

हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील या नोटीस मध्ये नमूद करण्यात आलं होतं. आता ही ऑडी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर खेडकर यांनी या ऑडी कारवर असलेला 27600 रुपयांचा दंड देखील दोन दिवसांपूर्वी भरल्याचं समोर आलं आहे.

पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार खेडकर कुटुंबीयांच्या ड्रायव्हरने काल रात्री चतुर्श्रुंगी पोलिस चौकीला आणून जमा केली आहे. खेडकर प्रशिक्षणार्थी आयएएस असून देखील याच गाडीवर महाराष्ट्र शासन पाटी आणि अंबर दिवा लावून त्या आयएएस असल्याचं दाखवत होत्या. त्यांनी अनेक सरकारी कार्यालयामध्ये जाताना या गाडीचा वापर केला आहे. प्रशिक्षणार्थी असताना अशा प्रकारची गाडी वापरण्याचा अधिकार नसताना देखील त्यांनी ती वापरल्याने पोलिस प्रशासनाकडून आता त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

दोन दिवसापूर्वी पुणे पोलिस या गाडीवर कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी गेले असता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर खेडकर यांच्या ड्रायव्हरने शनिवारी रात्री ही गाडी पोलिसांकडे सोपवली आहे. मात्र, या गाडीचे कागदपत्र अद्यापही आपल्याला प्राप्त झाले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पूजा खेडकर का आल्या चर्चेत?

पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी केलेल्या 'प्रतापा'मुळे त्या सध्या जोरदार चर्चेत आहेत. आपल्या खासगी ऑडी कारवर त्यांनी अंबर दिवा लावला होता.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर ताब्यात घेत त्यांचे सामान बाहेर काढले होते. आयएएस अधिकारी असतानाही त्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळत नसल्याने खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना कडक शब्दात समज देखील दिली होती. त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT