केडगाव (जि. पुणे) : दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष भानुदास सावता नेवसे व लक्ष्मण पांडुरंग दिवेकर, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी संगनमताने संघात ४० लाख ८६ हजार रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद लेखा परीक्षक राजेश भुजबळ यांनी यवत पोलिस ठाण्यात आज (ता. २३ ऑक्टोबर) दिली. (Corruption of Rs 41 lakh in Daund taluka co-operative buying and selling Sangh)
पोलिसांच्या माहितीनुसार, भानुदास नेवसे, लक्ष्मण दिवेकर, मुख्य व्यवस्थापक मोहन शितोळे, डेपो व्यवस्थापक आबा कुल, संदीप कुल, संदीप लडकत, राजेंद्र थोरात, गणेश थोरात, नाना कोकरे, नंदकुमार विश्वासे, योगेश चौधरी, शिपाई योगेश चांदगुडे या बारा जणांवर संगनमत, फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दौंड तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे.
लेखा परीक्षक भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, संघाचे २०१९ ते २०२० या काळातील लेखापरीक्षण सहायक निबंधकांना सादर केले आहे. अहवालातील अपहार लक्षात घेऊन निबंधकांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मार्च २०२१ मध्ये दिले होते. तत्कालीन अध्यक्ष भानुदास नेवसे व व्यवस्थापक शितोळे यांनी महाराष्ट्र बायो फर्टिलायझर कंपनीकडून ३५ लाख रुपयांची खते व औषधे घेऊन साठ्यामध्ये अफरातफर करून पाच लाख ८० हजार रुपयांचा अपहार केला. लक्ष्मण दिवेकर अध्यक्ष असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केडगाव येथे सभागृह बांधकामासाठी दिलेल्या निधीत सात लाख ८२ हजार रुपयांचा अपहार केला.
कडेठाण येथील डेपो व्यवस्थापक योगेश चौधरी याने १३ लाख रुपयांचा अपहार करून जादा दराने खते विकली. जादा दराने खते विकून जास्तीच्या १० लाख २९ हजार रुपयांचा अपहार करून गरीब व सामान्य शेतकऱ्यांची संगनमताने आर्थिक पिळवणूक केली आहे. दहिटणे खत डेपोमध्ये गणेश थोरात, संदीप लडकत, योगेश चांदगुडे, संदीप कुल यांनी संगनमताने तीन लाख ७२ हजार रुपयांचा अपहार संगनमताने केला. दहिटणे डेपोतील संदीप कुल यांनी एक लाख २० हजार रुपयांचा अपहार केला. संबंधित बारा जणांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी संगनमत करत व्यवस्थापन समितीची व सभासदांची ४० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक व अफरातफर केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार केशव वाबळे याबाबतचा तपास करीत आहेत. माजी अध्यक्ष नेवसे म्हणाले की, या लेखा परीक्षणवर आम्ही स्थगिती घेतली आहे. फेरलेखा परीक्षण चालू आहे. गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.