नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय : विदर्भातील शाळा १५ किंवा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षण संचालकांची विनंती न्यायालयाने फेटाळली.
२०२३ चा शासन निर्णय कायम : न्यायालयाने २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले.
उष्णतेचा मुद्दा महत्त्वाचा : "कडक उन्हात शाळा कशा भरवणार?" असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली.
विद्यार्थी-शिक्षकांना दिलासा : शिक्षक समितीच्या याचिकेनंतर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलत दिलासा दिला.
Vidarbha Schools Reopen: विदर्भातील शाळा १५ किंवा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षण संचालकांनी केलेली विनंती नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार विदर्भातील शाळा ३० जूनपासूनच सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विदर्भातील कडक उन्हात शाळा १५ जूनपासून सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात प्राथमिक शिक्षक समितीने याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत ९ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते याबाबत आज न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली.
विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत नागपूर खंडपीठात आज बुधवार (१० जून) न्यायाधीश अनिल किल्लोर व न्यायाधीश राजेश वाकोडे यांच्या समोर सुनावणी झाली. शिक्षण संचालनालयाने काल (ता. ९ जून) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात २२ जून पासून सुरु होणार असे म्हटले होते. हे परिपत्रक न्यायालयात शासनाकडून सरकारी वकीलांनी सादर केले आणि त्याप्रमाणे आदेश देण्याची विनंती केली.
याचिकाकर्त्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने ॲड. मा. डॉ. जी. बी कुलकर्णी यांनी शासनाच्या भुमिकेस विरोध केला.न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शासनाच्या भुमिकेवर असहमती दर्शविली. विदर्भातील शाळा १५ जून वा २२ जून पासून सुरू करण्याचा संचालकांचा आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला. २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा सुरू करण्याबाबत आदेश दिले.
२० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे आता विदर्भ विभागातील शाळा 30 जून 2023 रोजी सुरू होतील.विदर्भ वगळता महाराष्ट्रातील सर्व शाळा 15 जून 2023 रोजी सुरू होतील.
विदर्भातील तापमान मे-जून महिन्यात अनेकदा ४० अंशांच्या पुढे जातं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, “कडक उन्हात शाळा कशा भरवणार?” अशी चिंता व्यक्त करीत कोर्टाने सरकारला फटकारलं
शिक्षण संचालकांनी २८ मार्च २०२६ रोजी काढलेल्या पत्रानुसार विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, यापूर्वी २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार विदर्भातील शाळा ३० जूननंतरच सुरू करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते.
२००७ मध्येही अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. या वर्षीही जुनाच प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षक संघटनांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.
आज न्यायालयातील सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यश्र विजय कोंबे, नागपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, अमरावती जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष गोकुलदादा राऊत, नागपूर जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रमोद सुरोसे, प्रकाश सव्वालाखे, प्रशांत निंभोरकर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.