Ashish Bharati Sarkarnama
पुणे

PMC Covid Scam : 'बीएमसी'पाठोपाठ 'पीएमसी'तही कोविड घोटाळा; 'त्या' संशयित मृतांची फाइल पुन्हा उघडली जाणार का?

Deepak Kulkarni

चैतन्य मचाले-

Pune News: कोविड काळात मुंबई महापालिकेकडून मोकळ्या जागांवर तात्पुरती आरोग्य सेवा प्रदान करणारी कोविड सेंटर उभी करण्यात आली होती. या कोविड सेंटरची कंत्राटे शिवसेनेशी (ठाकरे गट) निगडित लोकांना देण्यात आली असून, त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. या प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई सुरू असतानाच आता पुण्यातील महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळ्याची फाइल ओपन होण्याची दाट शक्यता आहे. यात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या (Covid Scam ) काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी शिवाजीनगर येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. हे सेंटर सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांमध्ये येथे 18 ते 22 रुग्णांचे मृत्यू झाले होते. हे मृत्यू नक्की कशामुळे झाले यावर कोणताही खुलासा झाला नव्हता. पुणे महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यानिमित्ताने सुरुवातीच्या दिवसांत कोविड सेंटरमध्ये झालेल्या संशयित मृतांची फाइल पुन्हा उघडून त्यामागील सत्य बाहेर येणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. 600 वातानुकूलित बेड, 200 आयसीयू बेड येथे होते. या सेंटरची जबाबदारी लाइफलाइन एजन्सी यांच्याकडे देण्यात आली होती. हे केंद्र सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांमध्ये येथे 18 ते 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरदेखील या जम्बो कोविड सेंटरमध्ये अनेक मृत्यू झाले होते.

या सेंटरमध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी त्यावेळी रुग्णाच्या नातेवाइकांकडून करण्यात येत होत्या. या सेंटरची चौकशी करण्यासाठी आंदोलनेदेखील झाली होती. कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पोलिसांनी पालिकेतील तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Ashish Bharti) यांच्यासह तीन जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढील काही दिवसांत त्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या संशयित मृतांची बंद पडलेली फाइल पुन्हा उघडली जाण्याची शक्यता असून, यामधून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या सेंटरचे नियोजन पालिकेतील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होत असल्याने ही फाइल पुन्हा उघडली गेल्यास अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. (PMC)

...असे उभारले होते जम्बो कोविड सेंटर!

शहरात काेरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत स्वतंत्र कोविड सेंटर तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुसज्ज कोव्हिड सेंटर फक्त 18 दिवसांत बांधून पूर्ण केले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT