Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporation 
पुणे

अशीही उधळपट्टी; गंज चढू लागलेल्या पाईप्सच्या सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी-चिंचव़ड (Pimpri Chinchwad) शहराला सध्या मावळातील पवना धरणातील (Pavna Dam) पाणीपुरवठा होतो. त्यासाठी धरणातील पाणी पवना नदीपात्रात सोडून ते पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत बंधाऱ्यापर्यंत आणले जाते. तेथे ते उचलले जाते. त्यात पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते. त्यामुळे धरणापासून रावेतपर्यंत ते जलवाहिनीतून आणण्याची पावणेचारशे कोटी रुपयांची योजना २००८ ला सुरु करण्यात आली. मात्र, तिला मावळातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यासाठी त्यांनी ९ ऑगस्ट २०११ रोजी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी मरण पावले, तर अनेक जखमी झाले. त्याननंतर बंद पडलेले हे काम आजपर्यंत बंदच आहे.

दरम्यान, या प्रकल्पाच्या दीडशे कोटी रुपयांच्या दोन हजार १६९ पाईप्सला गंज चढू लागला आहे. तरी, त्यांच्या सुरक्षा आणि भाड्यासाठी श्रीमंत पिंपरी पालिका महिन्याला २५ लाख रुपये मोजत आहे. आतापर्यंत १० वर्षात त्यापोटी १५ कोटी रुपये पालिकेने मोजले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेचाच या प्रकल्पाला कडाडून विरोध आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरु होईल की नाही, याविषयी शंकाच आहे. तसेच हे पाईप दुसऱ्या योजनेतही वापरता येणार नाहीत, असे महापालिकेचे सह शहर अभियंता (पाणीपुरवठा) प्रवीण लडकत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांचा पुन्हा वापर करायचा झाला, तर या पाईपवर पुन्हा खर्च (गंज काढणे आदी) करावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही योजनाच बारगळण्याचीच चिन्हे तूर्त दिसत आहेत. मग, हा तब्बल दीडशे कोटींचा हा पांढरा हत्ती पालिका का पोसते आहे, अशी विचारणा करदाते नागरिक आता करू लागले आहेत. भविष्यात खरोखरच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला, तर त्यावर आतापर्यंत झालेला १४६ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. त्यानंतर, मात्र करदात्यांच्या पैशाची ती नाहक उधळपट्टीच ठरणार आहे. जर, तो पुन्हा चालू करायचे ठरविले तर पावणेचारशे कोटींचा हा प्रकल्प आता साडेसातशे कोटींच्या घरात गेला आहे. म्हणजे पुन्हा पावणेचारशे कोटी रुपयांचा हा मोठा भार सोसावा लागणार आहे.

या पाइपच्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांच्या पगारावर आतापर्यंत लाखोंचा खर्च करूनही पाच-सहा वेळा ते चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातून या पाईपच्या सुरक्षेसाठी खरंच रखवालदार नेमले आहेत का हा प्रश्न उभा राहतो आहे. तसेच ते नेमूनही चोरी होत असेल,तर पाईपच्या सुरक्षेवर झालेला खर्च पाण्यातच गेला असे आता करदाते म्हणू लागले आहेत. पालिका हद्दीबाहेर मावळ तालुक्यात कामशेत, कान्हेफाटा, बोऱ्हाडेवस्ती, वडगाव मावळ, ब्राम्हणवाडी, किवळे आणि गहूंजे येथे सध्या हे पाईप खासगी जागेत ठेवण्यात आले आहेत.

पालिका दर महिन्याला पालिका २५ लाख रुपये भाडे आणि सुरक्षारक्षकांच्या वेतनापोटी मोजत आहे. त्यामुळे ते गेल्यावर्षी पालिका हद्दीत रावेत येथे आणण्याचे ठरले. त्यावेळी त्यासाठी ८० लाख रुपये खर्च येणार होता. पण, ते काम त्यावेळी बारगळले. नुकताच स्थायी समितीच्या बैठकीत (ता.१३) हा विषय मंजूर करण्यात आला. मात्र, त्यासाठीचा खर्च आता वर्षभरात जवळपास दुप्पट झाला आहे. तब्बल एक कोटी ३४ लाख ६७ हजार रुपये खर्च हे एकवीसशे पाईप काही किलोमीटर अंतरावर आणण्यासाठी पालिका करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT