Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate
Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate Sarkarnama
पुणे

‘अशोक पवारांच्या होमपिचवर दादा पाटलांना आमदारांपेक्षा अधिक मते’

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : ‘मताला नाही, पण उसाला प्रतिटन तीन हजार रूपये भाव देणार’, हा मुद्दा घेऊन आम्ही रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Sugar Factory Election) लढविली. तो मुद्दा पटल्यानेच आमच्या पॅनेलला ४७ टक्के मते मिळाली, असे घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे नेते तथा कारखान्याचे नूतन संचालक दादा पाटील फराटे (Dada Patil Farate) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मला वैयक्तिक ५२ टक्के, तर आमच्या पॅनेलला ४७ टक्के मते ही एक रूपयादेखील न वाटता मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. (Dada Patil has more votes than MLAs on Ashok Pawar's home pitch : Sudhir Farate)

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे होमपिच असलेले वडगाव रासाई, मांडवगण फराटा आणि इनामगाव या तीन गटांत दादा पाटील यांना अशोक पवारांपेक्षा अधिकचे मतदान झाले आहे, असा दावा घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे नेते तथा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हासंघटक सुधीर फराटे (Sudhir Farate) यांनी केला.

आम्ही जसे ठामपणे आणि जाहीरपणे सांगतो की, या निवडणुकीत आम्ही मताला एक रुपयादेखील वाटला नाही, त्याप्रमाणे निवडणूक जिंकलेल्यांनीही तसे जाहीर करावे, असे आव्हान दादा पाटील फराटे यांनी दिले. ते म्हणाले, ‘घोडगंगा’ची निवडणूक आम्ही पक्षीय पातळीवर नव्हे; तर संस्थेच्या हितासाठी, गर्तेत अडकलेल्या या संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लढलो. या लढ्यात ज्यांना आमची भूमिका पटली, ते ठामपणे आमच्या पाठिशी राहिले. भूमिका पटली नाही, तिथे आम्ही कमी पडलो किंवा पैशांमुळे लोकांना आमच्याशी सहमत होण्यास जड गेले. तरीही या निवडणुकीचा निकाल आम्ही स्वीकारला आहे.

आम्हाला स्वाभिमानी उसउत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या पाठबळाचा अभिमान आहे. एक रूपयाही न घेता त्यांनी पॅनेलला ४७ टक्के मतदान देताना एक प्रतिनिधी कारखान्यावर पाठविला, हा खऱ्या अर्थाने आमचा विजय आहे. आमचा एक संचालक विजयी झाला. पण, संपूर्ण पॅनेल निवडून आल्याचा आनंद गावोगाव साजरा होत आहे. म्हणून त्या लोकांच्या कारखान्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधिल व कटीबद्ध आहोत, असेही दादा पाटील फराटे यांनी स्पष्ट केले.

'घोडगंगा'चा कारभार निष्क्रिय माणसाच्या हाती

निष्क्रिय माणूस २५ वर्षांपासून कारखान्याचा कारभार करीत असल्याचे मतदानातून सिद्ध झाले आहे. त्यांच्या पैशांच्या राजकारणाला लोकांनी नाकारले आहे. निवडणूक आली की, पैसे वाटून काहीही करता येते, हा समज लोकांनी फोल ठरविला आहे. यापुढे पैशांवर शिरूर तालुक्याचे राजकारण होणार नाही, हा संदेश सामान्य लोकांनी या निकालातून सत्ताधाऱ्यांना दिला आहे, असेही रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांनी सांगितले.

त्या ३९ गावांतच राष्ट्रवादीला भरभरून मते

रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहता, आंबेगाव मतदार संघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील ३९ गावांतून राष्ट्रवादीच्या पॅनेलला आठशे ते नऊशे मतांची आघाडी मिळाली. शिरूर तालुक्यातील ५९ गावांत व विशेषतः कारखान्याच्या उसपट्ट्यात आमच्या पॅनेलला भरभरून मते मिळाली ती पाहता, पैशांचे राजकारण करणारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हासंघटक सुधीर फराटे यांनी स्पष्ट केले.

मुलाला कामाचे स्वातंत्र्य द्यावे

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर मुलाला बसविले असले तरी सर्व अधिकार आणि कारभार आमदार अशोक पवार यांच्याकडेच असणार आहे. त्यांनी राजकारणाचा त्याग करून मुलाला स्वातंत्र्य द्यावे. त्यानेही कारखान्याला उर्जितावस्थेत आणावे. आमच्या शुभेच्छा राहतील, असे रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT