Dattatray Bharane and Harshvardhan Patil jointly hold the traditional antarpat during an Indapur wedding ceremony. Sarkarnama
पुणे

Indapur Wedding : दत्तामामा-हर्षवर्धन पाटलांनी मिळून लावलं लग्न : इंदापुरात कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी नवदांपत्यासाठी धरला अंतरपाट

Dattatray Bharane and Harshvardhan Patil : इंदापूरचे राजकारण गेली दोन दशके भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय संघर्षाभोवती फिरत आले आहे. विधानसभा निवडणुकांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा थेट राजकीय लढती झाल्या.

Jagdish Patil

Pune News, 29 Jul : पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील देवकाते आणि वाघमोडे कुटुंबाच्या विवाह सोहळ्याने नवदांपत्याच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला. सोबतच तालुक्याच्या राजकारणातही एक वेगळाच संदेश दिला. अनेक वर्षांपासून कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकाच मंचावर उपस्थित राहत नवदांपत्याच्या विवाहासाठी एकत्रितपणे अंतरपाट धरला.

पायल देवकाते आणि दत्तात्रय वाघमोडे हे दोघेही महसूल विभागात वर्ग-१ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्यास इंदापूरसह पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीने.

इंदापूरचे राजकारण गेली दोन दशके भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय संघर्षाभोवती फिरत आले आहे. विधानसभा निवडणुकांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा थेट राजकीय लढती झाल्या. एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप आणि कार्यकर्त्यांमधील संघर्षामुळे दोन्ही गटांतील राजकीय वैर कायम चर्चेत राहिले आहे.

अशा परिस्थितीत, राजकीय मतभेद बाजूला ठेवत दोन्ही नेत्यांनी एका शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या नवदांपत्याच्या विवाह सोहळ्यात अंतरपाट धरत त्यांना शुभाशीर्वाद दिले. त्यांच्या या कृतीची उपस्थितांमध्ये विशेष चर्चा रंगली. राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सभ्यता आणि परस्पर सन्मान जपण्याचा संदेश या प्रसंगातून दिला गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

इंदापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे हे एकत्र दर्शन सध्या तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विवाह सोहळ्यातील हा क्षण पाहून उपस्थितांनीही टाळ्यांच्या गजरात नवदांपत्यासह दोन्ही नेत्यांचे स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT