Pradeep Gartkar Sarkarnama
पुणे

Indapur Politics : विधानसभेचा मार्ग सुकर करण्यासाठी दत्तात्रेय भरणेंनी टाकला नवा डाव...

Pradeep Gartkar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी देण्याची दत्तात्रेय भरणे यांनी शिष्टमंडळासह पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 05 August : लोकसभा निवडणुकीत सर्व पणाला लावूनही इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना 25 हजार 951 मतांचे लीड मिळाले आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडी पाहता इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे विधानसभेचा आपला मार्ग सुकर करण्याच्या तयारीला लागले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करीत नवा डाव टाकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Gartkar) यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळासह इंदापूरचे (Indapur) आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली आहे.

त्यासाठी गारटकर यांच्या सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सहकार, कला-क्रीडा आणि विशेषतः दिव्यांग क्षेत्रातील कामाचा दाखला देण्यात आलेला आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या सुनेत्रा पवार यांच्यासाठी आजी माजी आमदारांसह अनेक नेत्यांची फौज उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी मैदानात उतरवली होती. तरीही इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांनीच आघाडी घेतली होती, त्यामुळे महायुतीच्या नेत्याची विशेषतः आमदार दत्तात्रेय भरणे यांना विधानसभेची वाट सोपी नसल्याचे दिसून आलेले आहे.

इंदापूरमधून सुळे यांना आघाडी मिळालीच. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गोटात दाखल झालेले जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती तथा सोनाई परिवाराचे प्रमुख नेते प्रवीण माने यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती. त्यात प्रवीण मानेही भरणे यांच्यासोबत होते. आता माने यांचा सवतासुभा असणार आहे.

महायुतीमध्ये इंदापूरची जागा विद्यमान आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर शांत राहिलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आता विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे विधानसभेला ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची अधिक शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे, तर महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षाकडून प्रवीण मानेंना उमेदवारी दिली जाते की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना संधी दिली जाते, हे पाहावे लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यात आपला निभाव लागावा म्हणून गारटकर यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी माजी मंत्री भरणे यांच्याकडून केली नाही ना, असा सवाल विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT