Chandrasekhar Shete Join BJP Sarkarnama
पुणे

खेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; माजी आमदाराच्या मुलीचा, 'कात्रज'च्या माजी संचालकाचा भाजपत प्रवेश

पवार आणि शेटे यांच्या प्रवेशामुळे खेड तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

राजेंद्र लोथे

वाडा (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाने (BJP) खेड (Khed) तालुक्यात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी आमदार नारायण पवार यांची कन्या प्रिया पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक (कात्रज) संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांनी आज (ता. २० ऑक्टोबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याशिवाय, राष्ट्रवादीचे खेड पंचायत समितीचे माजी सभापती यांनीही कमळ हाती घेतले आहे. पवार आणि शेटे यांच्या प्रवेशामुळे खेड तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. (Daughter of former Congress MLA from Khed joins BJP)

दरम्यान, शेटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यात त्यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचेच म्हणून ओळखले जात होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महासचिव विक्रांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपमध्ये तुमच्यावर अन्याय होणार नाही, असा शब्द बावनकुळे यांनी पवार आणि शेटे यांना दिला आहे. या वेळी मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभापती शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, शांताराम भोसले आदी या वेळी उपस्थित होते.

प्रिया पवार या खेडचे माजी आमदार (स्व.) नारायण पवार यांच्या कन्या आहेत. चंद्रशेखर शेटे यांनी कात्रज दूध संघात संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे वडिल बाळासाहेब शेटे हे तब्बल २२ वर्षे जिल्हा दूध संघात संचालक होते. एक वेळा दूध संघाचे अध्यक्षही होते. या दोघांशिवाय खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी आणि त्यांचे पती, माजी सरपंच पाटीलबुवा गवारी यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादीसाठी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात धक्का मानला जात आहे.

प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर शेटे म्हणाले की, खेड तालुक्यातील नेतृत्वाकडून दडपशाहीचे राजकारण केले जात आहे. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली जात आहे. तालुक्यातील जनता या प्रकारला कंटाळली असून आगामी २०२४ मध्ये खेड तालुक्यात भाजपचा आमदार होणार, हे निश्चित आहे, असेही शेटे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT