दौंड : यंदाच्या निवडणुकीत दौंडमध्ये स्थानिक समीकरणे जुळवली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली आहे. त्यांची मुख्य लढत नागरिक हित संरक्षण मंडळ या स्थानिक आघाडीशी होत आहे. भारतीय जनता पक्षाने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस काही जागांवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत राज्यात महायुतीतील घटक पक्षांनी काही ठिकाणी काडीमोड घेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत युती केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर सोईनुसार महायुती-आघाडीतील पक्षांनी युती केली आहे. सदस्यपदाच्या २६ जागांपैकी एका जागेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस या प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी २९ नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तेत आली. परंतु दौंड नगरपालिकेत डिसेंबर २०१६ पासून राष्ट्रवादी व शिवसेना युती असून नगरपालिकेच्या २४ सदस्यांपैकी राष्ट्रवादीच्या चिन्हावर १२ व शिवसेनेच्या चिन्हावर ०२, असे एकूण १४ सदस्य पक्षचिन्हावर निवडून आले होते.
निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या हेमलता परदेशी यांना पहिल्यांदा उपनगराध्यक्षपद दिले होते. परंतु शिवसेनेच्या दुसऱ्या नगरसेविका अनिता गणेश दळवी यांना मात्र राष्ट्रवादीने कार्यकाल संपेपर्यंत उपनगराध्यक्षपद दिले नाही.
डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला सदस्यपदाच्या २४ पैकी तब्बल ५ जागा दिल्या होत्या. त्यापैकी अनिता गणेश दळवी व हेमलता प्रविण परदेशी या पक्षचिन्हावर निवडून आल्या होत्या. तत्कालीन प्रभाग क्रमांक ३ - अ मधील शिवसेनेच्या उमेदवार भाग्यश्री पळसे व नागरिक हित संरक्षण मंडळाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पूजा गायकवाड - सरनोत यांना समसमान मते मिळाली होती. ईश्वरी चिठ्ठीच्या आधारे पूजा गायकवाड -सरनोत यांना विजयी जाहीर करण्यात आले होते.
दौंड नगरपालिकेच्या तीन वर्षांच्या विलंबाने होणाऱ्या या निवडणुकीसाठी जनतेतून थेट निवडून द्यावयाचे नगराध्यपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. १३ प्रभागातून २६ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जागा लढवत आहे.
राष्ट्रवादीने दोन जागा शिवसेनेला देऊ केल्या होत्या परंतु शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे एका जागेवर ऐनवेळी राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा करावा लागला. राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वसाधारण महिला करिता राखीव जागेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री आनंद पळसे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख आनंद पळसे यांच्या भाग्यश्री पत्नी आहेत.
दौंडमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय आणि ख्रिश्चन समाजाचे मतदारसंघ निर्णायक असल्याने उमेदवारी ठरवताना समाजिक संतूलन साधण्याचे गणित उमेदवार मांडत आहे. काही ठिकाणी ‘फोडाफोडीचे’ राजकारण पाहायला मिळाले. दौंड नगरपालिका निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.