Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : पालकमंत्रीपदाची सुत्रे घेताच अजितदादा पुन्हा सक्रीय; अन्य पक्षांमध्ये वाढली अस्वस्थता...

Pune Politics : दौऱ्यात चार डझन माजी नगरसेवक सहभागी

ब्रिजमोहन पाटील

Pune Latest News : अजित पवार हे महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्यास भाजपचा विरोध असतानाही आगामी निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन पवार यांना हे पद देण्यात आले आहे. त्यांनी शनिवारी पुण्यातील विविध प्रकल्पांची पाहणी केली. विकास कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांचा दौरा होता. अजितदादांच्या दौऱ्यात चार डझन माजी नगरसेवक सहभागी झाले होते.

. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरातील समस्या, विकास कामांचा आढावा बैठक घेताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदार, माजी नगरसेवकांनी मांडलेले विषय तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देत प्रशासनावर ‘दादा’ गटाचा प्रभाव निर्माण केला.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांना त्यांचा गट मजबूत करण्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावून शक्ती वाढविण्याचा प्रयत्न असणार. त्यामुळे अन्य पक्षांमधील अस्वस्थता वाढली आहे.

अजित पवार यांनी टिंगरे यांच्या वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा येथील नदी काठ सुधार प्रकल्प, खराडीतील ऑक्सिजन पार्क आणि जायका प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच स्वारगेट येथे मेट्रो स्टेशनच्या कामाची पाहणी करून वेगात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

शासकीय विश्रामगृह येथे शहरातील प्रश्‍नावर बैठक घेऊन प्रत्येक पदाधिकाऱ्यास त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. यामध्ये प्रामुख्याने समाविष्ठ २३ गावांमधील शाळांमधील पायाभूत सुविधांचा अभाव, जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे वर्ग करणे, पाणी टंचाई, सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्‍न या समस्या मांडल्या. त्यावर पवार यांनी समाविष्ट गावातील समस्या त्वरित सोडविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

भवन विभागाकडून इमारती, क्रीडांगणे, नाट्यगृहांसह इतर कामे अर्धवट ठेवली असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. त्यावर ८० टक्के पूर्ण झालेली कामे प्राधन्याने पूर्ण करा अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. पुण्यात क्रीडा विद्यापीठ उभारले जाणार आहे, त्यासाठी महंमदवाडी येथील शासनाच्या जागा आहेत, तेथील योग्य जागा शोधावी. वारजेतील पीपीपी तत्वावरील रुग्णालयाची उभारणी करण्याच्या कामाला गती द्या असेही पवार यांनी सांगितले.

या बैठकीत मोहंमदवाडीत क्रीडा विद्यापीठ, मुंढव्यात सायन्स सिटी, भैरोबानाला ते उरुळी कांचन आणि खराडी ते वाघोली सहा पदरी रस्त्यावर उड्डाणपूलासह मेट्रोचा प्रस्ताव आणि व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे आदेश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. यावेळी आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, राष्ट्रावादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, वैशाली बनकर, सदानंद शेट्टी, बाबुराव चांदेरे, बाळासाहेब बोडके, शंकर केमसे, सुभाष जगताप आदी सुमारे चार डझन माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT